ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार, तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:45 PM2024-01-02T14:45:26+5:302024-01-02T14:45:38+5:30
केंद्र सरकारने 'हिट अँड रन' कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे.
Truck Drivers Protest : केंद्र सरकारने 'हिट अँड रन' कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशभरातील ट्रक/टँपो/पेट्रोल-डिझेल टँकर चालकांनी संप पुकारला आहे. देशभरातील मालवाहू ट्रक चालक या आंदोलनात उतरले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. तसेच, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग लागत आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
ट्रक/टँकर वाहतुकीचे असे माध्यम आहे, ज्याद्वारे फळे आणि भाजीपाल्यापासून सर्व जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल-डिझेल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेले जाते. ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या मुंबईत दररोज 1.20 लाख मालवाहू ट्रक आणि कंटेनर येतात. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील अनेक भागांत या संपाचा परिणाम दिसून येत आहे.
450 कोटींचे नुकसान
परिवहन मंडळाच्या म्हणण्यानुसार, एक दिवसाच्या संपामुळे 120 ते 150 कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत 3 दिवसांच्या संपामुळे 450 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संपामुळे देशभरात महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे. सामान्यांना पेट्रोल आणि डिझेलची चिंता सतावत आहे.
महागाई वाढू शकते
पेट्रोल पंप असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 3-4 दिवसांच्या संपाचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येईल. दुचाकी वाहनधारक 3-4 दिवसांसाठी पेट्रोलचा साठा करू शकतात. मात्र मोठी वाहने आणि चारचाकी वाहनांची अडचण आहे. संप जास्त दिवस सुरू राहिला, तर साठा संपेल आणि पंपावर पेट्रोल-डिझेल उपलब्ध नसताना त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येईल. ट्रकचालकांच्या संपामुळे फळभाज्यासह सर्वच खाद्यपदार्थांचा पुरवठा ठप्प होऊन महागाईचा धोका वाढणार आहे.
संपाचे कारण काय ?
केंद्र सरकारने चालकांसाठीच्या हिट अँड रन प्रकरणात नवीन कायदा केला आहे. नवीन नियमानुसार, जर कोणी वाहनाला धडक देऊन पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय मोठा दंडही भरावा लागणार आहे. या नियमाविरोधात ट्रकचालकांनी तीन दिवसांचा संप जाहीर केला आहे. आमची चूक नसली तरी शिक्षा भोगावी लागेल, असे चालकांचे म्हणणे आहे.