ट्रकचालकांच्या संपाचा १० राज्यांना बसला फटका, १५ लाख ट्रकची चाके थांबली; फळे, भाजीपाला महागला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:57 AM2024-01-03T06:57:39+5:302024-01-03T07:02:02+5:30
Truck drivers protest : संपामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल, फळे-भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकल्या नाहीत.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन ‘हिट अँड रन’ कायद्याच्या (hit-and-run law) विरोधात ट्रक, डंपर आणि बसचालकांचा संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. जवळपास १५ लाख ट्रकची चाके थांबल्याचे सांगण्यात येत आहे. इंधन मिळाले नाही तर काय, या भीतीपोटी वाहनचालकांनी पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि उत्तराखंड आदी दहा राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक राज्यांत ट्रकचालकांच्या आंदोलनांनी तणाव निर्माण झाला. संपामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल, फळे-भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकल्या नाहीत.
जम्मू-काश्मीर, पंजाबमध्ये रांगा
पुरवठा विस्कळीत झाल्याने पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमधील इंधन केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि लोक इंधन मिळाले नाही तर काय या भीतीपोटी खरेदी करत होते. श्रीनगरच्या काही भागात आणि खोऱ्यातील इतरत्र वाहतूककोंडी झाली. हैदराबादमधील काही पंप वगळता कोणताही मोठा पुरवठा खंडित न झाल्याने दक्षिण भारतातील परिस्थिती चांगली होती.
ट्रकचालकांची पोलिसांशी झटापट
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये ट्रकचालकांची पोलिसांशी झटापट झाली. चालकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बिहारच्या हाजीपूर, राजस्थानच्या अजमेर आणि मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसचा संपाला पाठिंबा
काँग्रेसने ट्रकचालकांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला असून या कायद्याच्या गैरवापरामुळे खंडणीखोरांचे जाळे निर्माण होऊन संघटित भ्रष्टाचार होऊ शकतो, असा आरोप केला.
राजस्थानमध्ये सोमवारी रात्री काही ठिकाणी हिंसाचार झाला. जमावाने पोलिसांचे वाहन जाळले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. केकरी जिल्ह्यात तीन जखमी झाले.
जिल्हाधिकारी म्हणाले, तुमची औकात काय?
nशाजापूर येथील संघटनेने आंदोलन करत महामार्ग रोखून धरल्याने जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी वाहनचालकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोणीही कायदा हातात घेणार नाही. त्यावर एक ड्रायव्हर म्हणाला, चांगले बोला.
nत्यामुळे जिल्हाधिकारी संतापून म्हणाले की, तुम्ही स्वत:ला काय समजता?, काम करणार तुम्ही?, तुमची औकात काय?, त्यावर ड्रायव्हर म्हणाला की, आमची औकात नाही, हीच आमची लढाई आहे. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.