ट्रक मेकॅनिकच्या मुलीने क्रॅक केली NEET; 10 रुपये वाचवण्यासाठी दररोज 3 किमी पायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:52 PM2023-11-03T17:52:22+5:302023-11-03T17:53:06+5:30
आरती ही ट्रक मेकॅनिकची मुलगी असून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही.
नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) ही देशातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक आहे, ज्यामध्ये दरवर्षी लाखो इच्छुक डॉक्टर परीक्षा देतात. आरती झा नावाच्या विद्यार्थिनीची NEET सक्सेस स्टोरी आता समोर आली आहे. आरती झा यांनी वयाच्या 21व्या वर्षी NEET 2023 ची परीक्षा दिली आणि ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. तिचा डॉक्टर होण्याचा प्रवास सोपा नव्हता. आरती ही ट्रक मेकॅनिकची मुलगी असून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही.
ट्रक मेकॅनिक म्हणून काम करत असलेले आरतीचे वडील आपल्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि काळजी घेण्यासाठी दरमहा केवळ 20,000 रुपये कमवत होते. पैसे वाचवून त्यांनी मुलीला शिक्षण घेण्यास मदत केली. DNA नुसार, आरती झा चे कोचिंग सेंटर तिच्या घरापासून 17 किमी दूर होते. ती बसने कोचिंगला जायची पण बस कोचिंग सेंटरपासून दूर थांबत असे. दररोज 10 रुपये वाचवण्यासाठी ती 3 किमी चालायची. त्याच्या NEET च्या तयारीबरोबरच कुटुंबाला मदत म्हणून तिने ट्यूशन शिकवायलाही सुरुवात केली.
आरतीचे वडील कधी-कधी मुलीला कोचिंगला सोडण्यासाठी बाईकचा वापर करतात पण अनेकदा त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं. पैसे कमावण्यासाठी ती ट्यूशन घ्यायची पण अनेकदा तिला NEET चा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. ती थकून जायची. अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून ती मुद्दाम वीजेशिवाय अभ्यास करायची.
अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंखा बंद ठेवायची. शेवटी, आरतीने वैद्यकीय संस्थेत प्रवेश घेण्याचे आणि NEET परीक्षा उत्तीर्ण करण्याचे तिचे ध्येय साध्य केले. आरतीने NEET 2023 मध्ये 192 वा रँक आणि OBC श्रेणीमध्ये 33 वा रँक मिळवला. तिचे दोन भाऊ सध्या एसएससी परीक्षेची तयारी करत आहेत आणि आरती झा तिच्या कुटुंबातील पहिली डॉक्टर बनणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.