आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप
By बाळकृष्ण परब | Published: December 2, 2020 07:24 PM2020-12-02T19:24:39+5:302020-12-02T19:27:38+5:30
Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ट्रकचालकांच्या या भूमिकेमुळे देशात जीवनावश्यक वस्तूंसह या इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी शेतकऱ्यांकडून मात्र आंदोलन सुरू आहे. चिल्ला बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमधील काल झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे.
एआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.
शेतकरी नेते स्वराज सिंह यांनी सांगितले की, आम्ही रस्त्यावर बसलेलो नाही. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून आणि जवानांना तैनात करून आमची वाट अडवली आहे. आम्ही या जागेला तात्पुरत्या तुरुंगाची उपमा दिली आहे. तसेच आम्हाला येथे अडवणे हे अटकेप्रमाणे असल्याचे आम्ही मानतो. आता आम्हाला ज्याक्षणी सोडले जाईल तेव्हा आम्ही दिल्लीच्या दिशेने कूच करू.