रस्त्यावर ट्रक पलटला आणि लोक दारुच्या बाटल्या घेऊन पळाले
By Admin | Published: November 8, 2016 08:59 AM2016-11-08T08:59:48+5:302016-11-08T08:59:48+5:30
चिराग दिल्ली फ्लायओव्हरवर ट्रकचा अपघात झाल्यानंतर लोकांनी दारुच्या बाटल्या घेऊन पळ काढला
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - रविवारी दुपारी चिराग दिल्ली फ्लायओव्हरवर दारुचा वास सुटल्याने एकीकडे काही लोक त्रस्त झाले असताना, तेथून जाणा-या काही लोकांना मात्र प्रचंड आनंद झाला होता. दारुच्या बाटल्या घेऊन जाणा-या एका ट्रकचा त्याठिकाणी अपघात झाला होता. मग काय तेथून चाललेल्या लोकांनी हेल्मेट, खिसे जिथे जागा मिळेल तिथे बाटल्या ठेवल्या आणि पळ काढला. ज्यांनी जॅकेट घातले होते ते जास्त नशिबवान ठरले असंच म्हणावं लागेल.
हरियाणामधील जज्जर येथून निघालेल्या या ट्रकचा दुपारी तीन वाजताच्या सुमारास फ्लायओव्हरवर डिव्हायडरला धडक लागून अपघात झाला. अपघातानंतर चालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या दारुच्या बाटल्या लोकांनी पळवायला सुरुवात केली. हरियाणामध्ये तयार करण्यात आलेली ही दारु अवैधरित्या दिल्लीत आणली जात होती अशी शंका पोलिसांना आहे.
एकीकडे ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली असताना सगळीकडे दारुचा वास सुटला होता. तेथून बाईकवरुन निघालेल्यांनी बाईक थांबवून दारु नेण्यास सुरुवात केली. बातमी पसरताच जवळच्या कॉलनीमध्ये राहणा-यांनीदेखील गर्दी केली. कारमध्ये जाणा-यांनी बॉक्स उचलून आपल्या गाडीत टाकले. काही वेळानंतर अपघातस्थळी फक्त काचेचे तुकडे आणि बॉक्स राहिले होते.
ट्रक विमानतळावरुन नेहरु प्लेसच्या दिशेने जात होता. ड्रायव्हर आम्ही पोहोचण्याआधीच फरार झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातस्थळी पोहोचताच पोलिसांनी लोकांना तेथून हटकण्यास सुरुवात केली, त्यामुळे मोकळ्या हाती परतावं लागणारे निराश झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास करत आहेत.