'ट्रूडो यांनी केले आरोप...', भारत आणि कॅनडामधील वादावर अमेरिकेची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 01:32 PM2023-09-19T13:32:46+5:302023-09-19T13:34:06+5:30
खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंहच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडाने सोमवारी एका सर्वोच्च भारतीय मुत्सद्याची हकालपट्टी केली, त्यानंतर भारताने कॅनडाच्या एका उच्च राजनयिकाला पाच दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेशही जारी केले आहेत. एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या तणावावर आता अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. कॅनडाच्या सरे शहरात एका 'शीख कार्यकर्त्या'च्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांमुळे अमेरिकेने 'अत्यंत चिंतित' असल्याचे म्हटले आहे.
एकाच फ्रेममध्ये ७९५ खासदार; जुन्या संसदेत सत्ताधारी अन् विरोधकांचं एकत्र फोटोशूट
व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते अॅड्रिन वॉटसन म्हणाले, 'पंतप्रधान ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांबद्दल आम्ही अत्यंत चिंतित आहोत. आम्ही आमच्या कॅनेडियन सहकाऱ्यांच्या नियमित संपर्कात राहतो. कॅनडाने तपास करून दोषींना न्याय मिळवून देणे अत्यावश्यक आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाबद्दल बोलले. ते म्हणाले होते, 'कॅनडियन सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संबंधांच्या आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत कोणत्याही परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.
यानंतर कॅनडाने भारताच्या एका उच्चपदस्थ मुत्सद्याची हकालपट्टी करण्याची घोषणा केली. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही भारतातील एका प्रतिष्ठित राजनयिकाची हकालपट्टी करत आहोत. पण आपण या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ, जर हे सर्व सत्य सिद्ध झाले तर ते आपल्या सार्वभौमत्वाचे आदर करण्याच्या मूलभूत नियमाचे उल्लंघन होईल.
भारताने कॅनडाच्या सरकारने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. भारताचे म्हणणे आहे की, कॅनडातील हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आणि प्रेरित आहे. प्रत्युत्तर म्हणून, भारताने मंगळवारी कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावले आणि त्यांना कॅनडाच्या उच्च मुत्सद्द्याला बाहेर काढल्याची माहिती दिली. भारताने कॅनडाच्या राजनैतिकाला देश सोडण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.