विविधतेचा सन्मान करू तेव्हाच खरी लोकशाही अवतरेल, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:23 AM2022-08-16T06:23:19+5:302022-08-16T06:23:24+5:30
Chief Justice N. V. Ramana : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.
नवी दिल्ली : घटना समितीने सखोल विचाराअंती राज्यघटनेची निर्मिती केली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मात्र, आपण जेव्हा देशातील विविधतेतील एकात्मतेचा सन्मान करू तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी येथे केले.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. रमणा पुढे म्हणाले की, फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. राज्यघटनेच्या माध्यमातूनच लोकशाहीचा पाया रचण्याचे काम झाले.
रमणा यांनी भाषणामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, सैफुद्दिन किचलू आणि पी. व्ही. राजमन्नर स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख केला. असंख्य ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचेही सरन्यायाधीशांनी नमूद केले. वकिलांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख रमणा यांनी यावेळी केला. अनेक वकिलांनी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी आपले योगदान दिल्याचे ते म्हणाले.
फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते.
- एन. व्ही. रमणा, सरन्यायाधीश