ट्रम्प यांना भुरळ घालणार ‘ट्रम्प थाली’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 02:38 AM2020-02-23T02:38:21+5:302020-02-23T02:38:36+5:30
बुखारा रेस्टॉरंटने यापूर्वीही अनेक राष्ट्राध्यक्षांचा पाहुणचार केलेला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नवी दिल्लीत आयटीसी मौर्यचे बुखारा रेस्टॉरंट ‘ट्रप थाली’चा आस्वाद देणार आहे.
बुखारा रेस्टॉरंटने यापूर्वीही अनेक राष्ट्राध्यक्षांचा पाहुणचार केलेला आहे. त्यात अमेरिकेच्याही अनेक राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे. मागील ४१ वर्षांत या रेस्टॉरंटच्या पक्वान्नांच्या यादीत बदल झालेला नाही.
मागील अनेक राष्ट्राध्यक्षांसह ट्रम्पही या रेस्टॉरंटमध्ये जाणार असून, त्यांना त्यांच्या आवडीनुसार ‘ट्रप थाली’ पेश केली जाणार आहे. मात्र, यात कोणते पदार्थ असतील, हे हॉटेलने आताच स्पष्ट केलेले नाही.
बराक ओबामा यांनी २०१० व २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदावर असताना भारताचा दोन वेळा दौरा केलेला होता. तेव्हा त्यांनाही रेस्टॉरंटने ‘ओबामा थाली’ सादर केली होती. विशेष म्हणजे त्यानंतर ही थाली प्रसिद्ध झाली व अनेकांच्या पसंतीलाही उतरली. ओबामा थालीमध्ये तंदुरी झिंगा, मछली टिक्का, मुर्ग पोटी बुखारा व कबाब यांचा समावेश होता. ओबामा यांच्याप्रमाणेच बिल क्लिंटन यांनीही येथे खाण्याचा आनंद लुटलेला आहे. त्यांना ‘क्लिंटन थाली’ भावली होती.
बुखारामध्ये बहुतांश खाद्यपदार्थ तंदूरमध्ये केले जातात. यात विविध प्रकारचे कबाब, येथील खास ओळख असलेले दाल बुखारा व खस्ता रोटी व भरवां कुलचा यांचा समावेश आहे. ट्रम्प यांना अॅप्रनबरोबरच एम. एफ. हुसेन यांचे चित्रही भेट दिले जाणार आहे.