जगावर मंदीचे ‘शुल्क’काष्ठ, जगभरातील शेअर बाजारांसह धातू, कच्चे तेल, डॉलरच्या दरांत घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 06:12 IST2025-04-04T06:12:32+5:302025-04-04T06:12:52+5:30
Trump Tariffs: अमेरिकेने ९ एप्रिलपासून अतिरिक्त आयात शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात टीकेचे धनी झाले आहेत. २७ टक्के शुल्क लादल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवणार असून कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

जगावर मंदीचे ‘शुल्क’काष्ठ, जगभरातील शेअर बाजारांसह धातू, कच्चे तेल, डॉलरच्या दरांत घसरण
नवी दिल्ली - अमेरिकेने ९ एप्रिलपासून अतिरिक्त आयात शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात टीकेचे धनी झाले आहेत. २७ टक्के शुल्क लादल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवणार असून कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेने भारताला वाईट व्यापार पद्धतींचा 'सर्वात वाईट गुन्हेगार' म्हणून संबोधून शुल्क लादले आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यास उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या शुल्कवाढीमुळे भारताच्या जीडीपीवर ०.५० टक्क्यांनी परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, टेरिफमुळे अमेरिकेसह संपूर्ण जगात मंदी येऊ शकते, असे जेपी माॅर्गनने इशारा देताना म्हटले आहे. ट्रम्प यांनी शुल्कवाढ करताच त्याचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर झाला असून, बाजार कोसळले आहेत.
या शुल्कांचा भारतावर काय परिणाम होईल?
हे शुल्क भारताच्या निर्यातीवर किती परिणाम करेल, याचा वाणिज्य मंत्रालय अभ्यास करत आहे. भारताच्या तुलनेत चीन, बांगलादेश आणि व्हिएतनामवर जास्त शुल्क लावले गेले आहे, त्यामुळे भारताची परिस्थिती तुलनेने चांगली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार भारतीय उद्योगांना या शुल्कांच्या प्रभावातून सावरण्यास मदत करू शकतो. भारताने व्यापार सुलभ करण्यासाठी पावले उचलली, लॉजिस्टिक सुधारले आणि धोरण स्थिर ठेवले तर या परिस्थितीतून चांगले संधी मिळू शकतात.
इतरांच्या तुलनेत भारतावर टॅरिफ कमी; होऊ शकतो असा फायदा!
रेसिप्रोकल टॅरिफमुळे जागतिक परिस्थिती बदलणार असून त्याचा वापर करून जागतिक व्यापार व वस्तू उत्पादनातील स्थिती मजबूत करण्याची संधी भारताला उपलब्ध होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ही भारतासाठी पीछेहाट नाही. ही संमिश्र स्थिती आहे. तिचा लाभ घेता येऊ शकतो.’ विश्लेषकांच्या मते, भारतावरील कर अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
भारताला आपली उत्पादने जागतिक दर्जाची बनवावी लागतील. अमेरिकेने चीनवर सर्वाधिक ५४%, व्हिएतनामवर ४६ %, बांगलादेशवर ३७% आणि थायलंडवर ३६% कर लावला आहे.
भारतासह इतरांनी ५० वर्षे अमेरिकेला लुटले, पण आता ते थांबेल : ट्रम्प
अमेरिका परदेशात उत्पादित वाहनांवर २५% शुल्क लावणार आहे. आत्तापर्यंत अमेरिका इतर देशांच्या मोटारसायकलवर फक्त २.४% शुल्क आकारत होता, तर भारत ६०%, व्हिएतनाम ७०% आणि इतर देश यापेक्षा जास्त किंमत आकारत आहेत. त्यांनी ५० वर्षे अमेरिकेला लुटले, पण आज ते लुटणे संपणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिका बनणार सर्वांत श्रीमंत देश...
ट्रम्प म्हणाले, अमेरिका इतर कोणत्याही देशापेक्षा श्रीमंत असेल. आज आपण अमेरिकन कामगारासाठी उभे आहोत. आम्ही अमेरिका फर्स्ट राबवत आहोत. आपण खूप श्रीमंत होऊ शकतो. हे आता तुम्हाला अविश्वसनीय वाटेल; परंतु आता आपण अधिक हुशार होत आहोत.
टॅरिफमधून सूट हवी असेल तर उत्पादने अमेरिकेत तयार करा
अमेरिका टॅरिफच्या बाबतीत जशास तसा प्रतिसाद देईल. ज्या देशांना अमेरिकन बाजारात प्रवेश हवा आहे त्यांना किंमत मोजावी लागेल. कोणत्याही कंपनीला टॅरिफमधून सूट हवी असेल तर तिला तिची उत्पादने अमेरिकेत तयार करावी लागतील. टेरिफमुळे अमेरिकेचा विकास होईल.
जीडीपीवर काय परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेल्या जशास तशा शुल्कामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ०.५० टक्क्यांवरून सहा टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.