सैन्यावर भरवसा ठेवा

By admin | Published: September 26, 2016 03:54 AM2016-09-26T03:54:06+5:302016-09-26T03:54:06+5:30

सैन्य बोलत नाही, ते पराक्रम करून दाखवते. सव्वाशे कोटी भारतीयांना सुखशांतीने जीवन जगता यावे यासाठी आपले सैन्य सदैव सज्ज आहे व देशाविरुद्धचे कोणतेही कारस्थान हाणून पाडण्यास ते समर्थ आहे

Trust the soldiers | सैन्यावर भरवसा ठेवा

सैन्यावर भरवसा ठेवा

Next

नवी दिल्ली : सैन्य बोलत नाही, ते पराक्रम करून दाखवते. सव्वाशे कोटी भारतीयांना सुखशांतीने जीवन जगता यावे यासाठी आपले सैन्य सदैव सज्ज आहे व देशाविरुद्धचे कोणतेही कारस्थान हाणून पाडण्यास ते समर्थ आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिली. त्याचबरोबर उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात व्यक्त होत असलेला आक्रोश व संताप स्वाभाविक असला तरी या संतापाला विधायक कामाकडे वळवून त्याचा उपयोग देशोद्धारासाठी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी देशवासीयांना केले.
‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ची सुरुवातच उरी येथील हल्ल्याच्या संदर्भाने करून पंतप्रधान म्हणाले की, या हल्ल्याने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. यावरून देशात शोक आहे व आक्रोशही आहे. या हल्ल्यात जे १८ बहाद्दर जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनी केवळ मुलगा, भाऊ किंवा पती गमावलेला नाही. ही संपूर्ण देशाची हानी आहे. या हल्लेखोरांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी हल्ला झाला त्या दिवशी सांगितले होते. आजही मी त्याचा पुनरुच्चार करीत आहे.
समाज माध्यमांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या भावना समजतात व त्यामुळे लोकशाहीला बळ मिळते असे सांगून पंतप्रधानांनी इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या हर्षवर्धन नावाच्या विद्यार्थ्याने या माध्यमातून पाठविलेल्या संदेशाचा उल्लेख केला. उरी हल्ल्यानंतर आपण खूप विचलित झालो व खूप विचार केल्यानंतर दररोज तीन तास जास्त अभ्यास करून देशाला उपयोगी असा नागरिक होण्याचा संकल्प केला, असे त्याने कळविले होते.
याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, देशवासियांच्या मनात सध्या जो आक्रोश आहे तोही एका दृष्टीमे बहुमोल आहे. हे राष्ट्रचेतनेचे प्रतिक आहे. या आक्रोशातून देशासाठी काही तरी करण्याचा इरादा व्यक्त होत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, १९६५ च्या (पाकिस्तानविरुद्धच्या ) युद्धाच्या वेळीही संपूर्ण देशाला असेच स्फूरण चढले होते. आक्रोश व्यक्त होत होता, देशभक्तीला उधाण आले होते. काही तरी करण्यास प्रत्येकजण आतूर होता. त्यावेळी पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांनी देशवासियांचे हे भावविश्व उत्तम प्रकारे हाताळले होते. त्यांनी त्यावेळी ‘जय जवान, जय किसान’चा मंत्र देऊन सामान्य माणसालाही देशासाठी काम करण्यास प्रेरित केले होते. बॉम्ब-बंदूकांच्या धमाक्याखेरीज प्रत्येक नागरिकास देशभक्ती व्यक्त करण्याचे इतरही मार्ग असतात हे लालबदूर शास्त्री यांनी दाखवून दिले होते.
देशवासियांनी त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत मनात दाटलेल्या संतापाला व आक्रोशाला विधायक कार्याच्या माध्यमातून देशभक्ती व्यक्त करून वाट करून द्यावी, असे आवाहन करताना मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधीजींनीही हेच केले होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनाची तीव्रता विधायक कार्याकडे वळविण्याचे त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले. आपण सर्वांनी यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. सैन्यदले त्यांचे कर्तव्य बजावतील, शासनात बसलेले त्यांचे त्यांचे काम करतील आणि त्यासोबत आपण सर्वांनी, प्रत्येक नागरिकाने देशभक्तीने प्रेरित होऊन विधायक कामे केली तर देश नक्कीच उच्च यशोशिखरे गाठेल.

दोन वर्षांचे प्रामाणिक गुफ्तगू
येत्या विजयादशमीला मोदींच्या ‘मन की बात’ला दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षांत असंख्य नागरिकांनी जे प्रेम दिले, सूचना व भावना कळविल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानताना मोदी म्हणाले, हा कार्यक्रम सरकारी कामांचे गुणगान करणारा होऊ नये यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला. तो राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा व कुरघोडी करण्याचा कार्यक्रम होऊ नये, अशीही माझी मनापासूनची इच्छा होती. विविध प्रकारची दडपणे होती, काही वेळा मनाला प्रलोभन व्हावे अशी स्थिती होती, काही वेळा मनातील नाराजी व्यक्त करावीशी वाटली. नव्हे, मी ती व्यक्त करावी यासाठी दबावही आले. पण श्रोत्यांच्या आशीर्वादाने मी कार्यक्रमाचे तारू सुखरूपपणे किनारी लावू शकलो व सर्वसामान्यांशी गुफ्तगू करू शकलो, याचा आनंद आहे.


उरी हल्ल्यातील जखमी जवानाचे अखेर निधन
काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या छावणीवर
१८ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अतिरेक्यांचा शोध घेत असताना गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान पिताबस मांझी (३०) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांची संख्या १९ झाली.

Web Title: Trust the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.