विश्वासार्ह सरकार

By admin | Published: May 27, 2017 02:47 AM2017-05-27T02:47:04+5:302017-05-27T02:47:04+5:30

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल.

Trusted Government | विश्वासार्ह सरकार

विश्वासार्ह सरकार

Next

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल. अतिशय आत्मविश्वासाने काम करणारा, जे करायचे आहे, ते वेळोवेळी जनतेला स्वत:हून सांगणारा, भ्रष्टाचाराला थारा न देणारा आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता आणणारा नेता असेच मोदी यांच्या तीन वर्षांच्या कामकाजाचे वर्णन करता येईल. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेकदा सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे नेते सत्तेत मश्गुल होताना दिसतात. पण मोदी यांनी मात्र तसे स्वत:च्या बाबतीत होऊ दिलेले नाही आणि पक्षाच्या नेत्यांवरही वचक ठेवल्याने तेही तसे वागताना दिसलेले नाहीत. मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय, अधिकाऱ्यांच्या निष्कारण होणाऱ्या परदेश दौऱ्यांतील कपात, अकार्यक्षम मंत्री वा अधिकाऱ्यांना प्रसंगी सुनावण्याचे प्रकार अशी अनेक उदाहरणे
मोदी यांनी सरकारी कामात शिस्त आणण्यासंदर्भात सांगता येतील. त्यामुळेच जनतेच्या मोदी व त्यांच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. मुळात अनेक वर्षांनी बिगरकाँग्रेसचे सरकार केंद्रात आल्याने जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या. त्या सर्व पूर्ण करणे शक्य नसले तरी त्या दृष्टीने सरकार किमान पावले टाकताना या काळात दिसले आहे. मोदी सरकारच्या काळात गरिबी कमी झाली, रोजगार वाढले, भ्रष्टाचार पूर्णत: थांबला, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला असे काहीच घडलेले नाही. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला पूर्णत: आळा बसला वा सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तान शांत झाला, असेही या काळात दिसलेले नाही. वास्तविक, गेल्या तीन वर्षांत रोजगार सातत्याने कमी होत असून, आयटी क्षेत्रातील नोकऱ्या ज्या वेगाने जात आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये घबराटच आहे. शेतकऱ्यांची आंदोलने
हमीभावासाठी सुरूच आहेत, कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या आत्महत्या वाढतच चालल्या आहेत.
काश्मीर प्रश्न सोडविणे अवघडच आहे. पण तो सुटावा, यासाठीही पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. धार्मिक तेढ, जातीय विद्वेष, असहिष्णुता यानिमित्ताने सरकारवर सातत्याने टीका होत आहे. विद्यापीठांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हे सारे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातूनही दिसून आले. तरीही आजच्या स्थितीत देशातील जनतेला खात्री वाटत आहे ती केवळ नरेंद्र मोदी यांची. त्यांना केवळ मोदी हेच आश्वासक नेते वाटतात. ते जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, यावर जनतेचा विश्वास आहे. मोदी सरकारचे तीन वर्षांतील यशाचे नेमके हेच गमक आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये सहमती घडवून जीएसटीचा कायदा संमत करवून घेण्यात हे सरकार यशस्वी ठरले, याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. तसेच देशाचा विकास साधायचा असेल, तर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेत मोदी सरकारने वीज, रस्ते, सागरी वाहतूक, रेल्वे वाहतूक यांत सुधारणा सुरू केल्या. त्या लोकांना भावल्या आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत: यशस्वी झाले, असे म्हणता येत नसले तरी मोदी नावाची जादू जगभरातील सर्व राष्ट्रांच्या नेत्यांवर आहे. त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे जगभरातील देशांना भारताचे सतत नाव घ्यावे लागत आहे. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजना प्रत्यक्षात यायला वेळ लागेल. पण या योजना यशस्वी झाल्याचा फायदा देशालाच होईल. बहुधा यामुळेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या बहुसंख्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने भाजपालाच निवडून दिले. अगदी ईशान्येकडील राज्यांत जिथे भाजपा हे नावही नव्हते, तेथील राज्येही त्या पक्षाच्या हातात आली. आपणच देशाचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात मोदी आणि त्यांचे सरकार यशस्वी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेससारख्या अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रीय पक्षाला अद्यापही सावरणे अवघड झाले आहे. मात्र आपल्या निर्णयांची फळे पुढील दोन वर्षांत जनतेपर्यंत पोहोचवणे, हे महत्कार्य मोदी सरकारला करावे लागणार आहे. तोपर्यंत अन्य विरोधक सावरणे अवघड असले तरी जनतेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहेत, याची खात्री पटणे गरजेचे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला दीड महिना शिल्लक आहे. त्यासाठी उमेदवार सहमतीने निवडला जावा, ही अपेक्षा आहे. निवडणुकांमध्ये यशाच्या अश्वमेधावर स्वार असलेल्या मोदी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे हीच खरी कसोटी असेल.

Web Title: Trusted Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.