केजरीवालांना बांगड्या देण्याचा प्रयत्न
By admin | Published: September 9, 2016 03:47 AM2016-09-09T03:47:41+5:302016-09-09T03:47:41+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दिल्ली व लुधियाना येथील रेल्वेस्टेशनवर भाजप, अकाली दल आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले
नवी दिल्ली/लुधियाना : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दिल्ली व लुधियाना येथील रेल्वेस्टेशनवर भाजप, अकाली दल आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले. दिल्लीमध्ये तर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केजरीवालांना बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. आपने निदर्शकांनी केजरीवालांशी गैरवर्तणुक केल्याचा आरोप केला तर भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे.
केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली तसेच लुधियाना (पंजाब) येथील रेल्वेस्टेशनवर निदर्शने करण्यात आली. ते पंजाबला जाण्यासाठी सकाळी सात वाजता नवी दिल्ली रेल्वेस्टेशनच्या फलाट क्रमांक एकवर आले. तेव्हा दिल्ली भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून त्यांना बांगड्या दाखविल्या. काही निदर्शकांनी पोलिसांशी रेटारेटी केल्यामुळे केजरीवाल गराड्यात सापडले. त्यांनी आमदारांच्या गैरवर्तणुकीबाबत बोलावे तसेच संदीप कुमारचा बचाव करणारे आशुतोष यांची हकालपट्टी करावी, अशी निदर्शकांची मागणी होती.