लिंगायतांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:54 AM2018-04-28T00:54:40+5:302018-04-28T00:54:40+5:30
मुख्यमंत्री : बसवेश्वर स्मारक उभारणीला १५ दिवसांत गती!
सोलापूर : राज्यातील लिंगायतांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले. मंगळवेढ्यातील (जि. सोलापूर) महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या उभारणीसंदर्भात येत्या पंधरा दिवसात मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल,अशी घोषणाही केली.
होटगी मठाचे पीठाधिपती लिंगैक्य योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचा संकल्पसिध्दी समारंभ दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वीरतपस्वी मंदिर आणि ‘एसव्हीसीएस’ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झाला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह काशी, उज्जैन आणि श्रीशैल पीठाचे जगद्गुरू, होटगी मठाचे विद्यमान पीठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी,यांच्यासह विविध मठांचे मठाधिपती उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख यांनी प्रास्ताविकात ओबीसी प्रमाणपत्र आणि बसवेश्वर स्मारकासंदर्भात मागण्या केल्या. त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकारसाठी राज्य सरकारने जागा दिलेली आहे. आता हे काम पुढे नेण्यासाठी येत्या पंधरा दिवसात मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील वीरशैव समाजातील नागरिकांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा जातीचा उल्लेख केलेला असतो. या उल्लेखामुळे समाजातील लोकांना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. याबाबत ओबीसी आयोगाकडे पाठपुरावा केले जाईल. यावेळी काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांचे आशीर्वचन झाले.