सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 23, 2017 01:10 AM2017-01-23T01:10:07+5:302017-01-23T01:10:07+5:30
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी जारी केलेल्या ३२ पानी निवडणूक जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक वर्गाला
मीना-कमल / लखनौ
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी जारी केलेल्या ३२ पानी निवडणूक जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर अखिलेश आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे छायाचित्र आहे.
मागील पृष्ठावर अखिलेश यांच्यासमवेत राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, चौधरी चरणसिंग, जनेश्वर मिश्र आणि चंद्रशेखर यांचे फोटो आहेत, मात्र मुलायमसिंग यांचे बंधू समाजवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांचे छायाचित्र नाही. लखनौतील पक्ष मुख्यालयात निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करताना अखिलेश यांच्यासोबत पत्नी डिंपल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मुलायमसिंग आणि शिवपाल यादव यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे टाळले. गरीब, अल्पसंख्यकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न दिसून येतो मात्र या जाहीरनाम्यात २०१२ मध्ये मुस्लिमांना देण्यात आलेल्या ठोस आश्वासनासारखे काहीही नाही.
स्मार्ट फोनसाठी १ कोटी ४० लाख लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेप्रमाणे लोकांनी मतदान केल्यास समाजवादी पक्षाला ३०० जागा जिंकून सरकार स्थापन करता येईल, असा विश्वास अखिलेश यांनी भाषणात व्यक्त केला.
गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ...
च्राज्यातील एक कोटी लोकांना दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन दिली जाणार असून अति गरिबांना नि:शुल्क गहू आणि तांदूळ दिला जाईल. घरगुती कामगार आणि असंघटित मजुरांसाठी विशेष योजना सुरू केली जाईल, असे आश्वासन अखिलेश यांनी या वेळी दिले.
च्आग्रा, कानपूर, मेरठ आणि वाराणसीमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचे तसेच लखनौ विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अच्छे दिन कुठे आहेत? मोदींवर हल्लाबोल...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन ’ आणि ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा दिला. केंद्रातील सरकारला तीन वर्षे झाली आहेत.
जनता आता विकास कुठे आहे, असा सवाल करीत आहे. केंद्र सरकारने विकासाच्या बहाण्याने कधी लोकांच्या हाती झाडू दिला तर कधी योगा करवून घेतला. आता अर्थसंकल्पात काही नव्या बाबी दिसून येतील, अशी आशा आहे.
दृष्टिक्षेपात जाहीरनामा...-
शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज.दुष्काळग्रस्त बुंदेलखंडमध्ये पाण्याची उपलब्धता.शेतकऱ्यांसाठी नवी व्यावहारिक पीक विमा योजना.गुरांवर उपचारासाठी १०२,१०८ च्या सेवेनुसार विशेष अॅम्ब्युलन्स सेवा.विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मोफत वाय-फाय.प्रत्येक विभागात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर समाजवादी अभिनव विद्यालयाची स्थापना.मध्यान्ह भोजनाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला एक लीटर देशी तूप आणि एक किलो दूध पावडर.गरीब आणि कमकुवत घटकांतील रुग्णांना दुर्धर रोगांसाठी नवी आरोग्य विमा योजना.प्रत्येक जिल्ह्यात एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना.
अल्पसंख्यक वर्गातील युवकांसाठी एक लाख नव्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायांची निर्मिती.
सुन्नी- शिया वक्फ मंडळाला स्वावलंबी बनविणे. वाराणसीमध्ये हज हाऊसची निर्मिती.
ग्रामीण भागात घरगुती ग्राहकांना २४ तास वीज उपलब्ध करवून देणे.
सर्व प्रमुख शहरांमधील वाहतुकीची कायमस्वरूपी कोंडी सोडविणे.
समाजवादी पेन्शन योजना आणि अन्य पेन्शन योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबाना एक हजार रुपये मासिक पेन्शन.
६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या वकिलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना १० लाखांची मदत.