विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:43 AM2023-11-01T05:43:41+5:302023-11-01T05:44:47+5:30
कोणकोणत्या नेत्यांना आले इशारे? जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आपल्या मोबाइलवर सरकार प्रायोजित हल्लेखोर सायबर हल्ले करण्याचा आणि फोन हॅक करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा इशारा ॲपल मोबाइल कंपनीकडून मिळाल्याचा दावा अनेक विरोधी पक्षनेत्यांनी मंगळवारी केला. हा आरोप फेटाळून लावत माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले.
कुणाला आले इशारा?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शशी थरूर, पवन खेरा, के.सी. वेणुगोपाल, सुप्रिया श्रीनाते, खासदार महुआ मोईत्रा, सरचिटणीस सीताराम येचुरी, अखिलेश यादव, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार राघव चढ्ढा, असदुद्दीन ओवेसी यांना आयफाेनवर अलर्ट आला आहे.
ॲपल म्हणते...
आयफोन-निर्माता ॲपल इनकॉर्पोरेटेडने या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली की, काही धोक्याच्या सूचना खोट्या अलार्म असू शकतात आणि काही हल्ले शोधले जाऊ शकत नाहीत. या सूचना सरकार प्रायोजित हल्लेखाेरांकडून झाल्याचे थेट म्हणता येणार नाही. तथापि, विरोधी पक्षांच्या नेत्यांना इशारे कशामुळे मिळाले, हे मात्र सांगता येणार नाही.
या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी सरकार चौकशी करेल. आम्ही ॲपलला कथित राज्य प्रायोजित हल्ल्यांच्या वास्तविक, अचूक माहितीसह तपासात सामील होण्यास सांगितले आहे.
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री