Bageshwar Dham: तुकाराम महाराज महान संत, तेच माझे आदर्श; अखेर बागेश्वर बाबाला उपरती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:43 PM2023-01-31T20:43:38+5:302023-01-31T20:45:00+5:30
महाराष्ट्रातील या तीव्र भावना लक्षात येताच बागेश्वर धाम यांनीही आपलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.
भोपाळ - बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे. आता, बागेश्वर बाबाच्या विरोधात कुणबी मराठा समाज रस्त्यावर उतरला असून बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुणबी युवा मंचच्यावतीने करण्यात आली. तर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही बागेश्वर बाबा दिसेल, तिथे ठोकून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रातील या तीव्र भावना लक्षात येताच बागेश्वर धाम यांनीही आपलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.
संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीई फुले यांचा अवमान करण्यात आला होता. आता, थेट संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्याबाबत बागेश्वर धीरेंद्र शास्त्री नावाच्या महाराजने टिका केली आहे. त्या निषेधार्थ बुलडाण्यात आज उपविभागीय (महसूल)कार्यालयासमोर धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. कुणबी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर, आता बागेश्वर बाबाने आपले शब्द मागे घेत असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.
संत तुकाराम महाराज हे महान संत आहेत, ते माझे आदर्श आहेत. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो, असं धीरेंद्र शास्त्री बाबाने म्हटले. धीरेंद्र बाबांनी वक्तव्य मागे घेत असल्याचा बाबाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
काय म्हणाले होते #बागेश्वर धाम
'संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक महात्मा. त्यांची पत्नी रोज त्यांना मारायची. रोज काठीने मारत होती. तुम्ही बायकोचा रोज मार खाता, लाज वाटत नाही? असा प्रश्न कुणीतरी तुकारामांना एकदा विचारला होता. ही तर परमेश्वराची कृपा आहे, मला मारणारी बायको मिळाली, असं उत्तर तुकारामांनी दिलं होतं. यात कृपा कुठली? असं तुकोबांना पुन्हा विचारण्यात आलं. प्रेम करणारी बायको मिळाली असती तर देवाच्या प्रेमात पडलो नसतो, बायकोच्या मागे फिरत राहिलो असतो', असं तुकारामांनी सांगितल्याचं बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र शास्त्री महाराजाने आपल्या प्रवचनात म्हटलं होतं. यामुळे हा बाबा वादात आला होता. या वक्तव्यावरून त्याच्यावर महाराष्ट्रातून जोरदार टीका करण्यात आली.