अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:10 IST2025-03-17T18:09:49+5:302025-03-17T18:10:49+5:30

अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

Tulsi Gabbard Meets Rajnath Singh: America should take action against Khalistanis; India's demand | अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी

अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी

India Raises Khalistan Issue: अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखळ झाल्या आहेत. त्यांनी सोमवारी(17 मार्च 2025) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी तुलसी गबार्ड यांच्याशी झालेल्या भेटीत खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिस (SFJ) च्या भारतविरोधी कारवायांचा मुद्दा उपस्थित केला आणि या संघटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
पन्नू यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन

एएनआयच्या वृत्तानुसार, तुलसी गबार्ड यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या नेतृत्वाखालील SFJ बद्दल भारताची चिंता व्यक्त केली आणि अमेरिकेला या संघटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. ही बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकन वकिलांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावला होता.

पण, भारताने पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नात भारताची भूमिका नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे आणि तो दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात वॉन्टेड गुन्हेगार आहे. त्याला दहशतवादविरोधी कठोर कायदा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

संरक्षण सहकार्य वाढविण्यावर चर्चा
अमेरिकेच्या टॅरिफ वाढीवर बोलताना तुलसी गबार्ड म्हणाल्या की, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि भारतातील लोकांचे कल्याण पाहत आहेत यात शंका नाही. त्याचप्रमाणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पदेखील अमेरिकेचे आणि देशातील जनतेचे हित समोर ठेवत आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एका चांगल्या समाधानाकडे वाटचाल करत आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चांगली समज आहे आणि ते चांगले उपाय शोधण्यात सक्षम आहेत.

तुलसी गबार्ड आणि अजित डोवाल यांचीही भेट 
तुलसी गबार्ड यांनी एनएसए अजित डोवाल यांचीही भेट घेतली. डोवाल आणि गबार्ड यांच्यातील बैठकीत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्यावर मुख्य चर्चा झाली. 

Web Title: Tulsi Gabbard Meets Rajnath Singh: America should take action against Khalistanis; India's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.