तुपोलेव टेहळणी विमाने होणार निवृत्त
By admin | Published: March 28, 2017 01:46 AM2017-03-28T01:46:58+5:302017-03-28T01:46:58+5:30
शत्रूच्या पाणबुड्यांवर अखंड नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी
नवी दिल्ली : शत्रूच्या पाणबुड्यांवर अखंड नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या सोविएत बनावटीच्या ‘तुपेलेव १२४ एम’ विमानांचा ताफा तब्बल २९ वर्षांच्या गौरवपूर्ण सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.
पूर्वीच्या सोविएत संघाकडून घेतलेली ही लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने सन १९८८ मध्ये गोव्यात दाभोळी येथे सर्वप्रथम नौदलात दाखल झाली. जगभर नावाजलेल्या या विमानांनी तेव्हापासून नौदलाच्या प्रत्येक कारवाईत व युद्धसरावात आपली मातब्बरी दाखवून दिली.
टप्प्याटप्प्याने एकूण आठ तुपोलेव विमाने नौदलात दाखल झाली. सध्या त्यापैकी फक्त तीन प्रत्यक्ष सेवेत होती.
तमिळनाडूतील ‘आयएनएस राजली’ हा या विमानांच्या ताफ्याचा सन १९९२ पासून स्थायी तळ आहे. तेथेच येत्या बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत या विमानांना नौदल सेवेतून औपचारिक निरोप दिला जाईल. तुपोलेव विमानांच्या एका प्रदर्श नी दालनाचेही त्यावेळी उदघाटन होईल. सोबतच ‘साजली’ नौदल तळाचा रौप्य महोत्सवही त्यावेळी साजरा होईल.
‘टीयू १४२ एम’ विमानांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळात एकूण ३० हजार तासांची विनाअपघात उड्डाणे केली. बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञानानुसार त्यांच्यात अनेक वेळा प्रसंगोपात्त सुधारणा व बदल केले गेले. वयाने जुनी झाली तरी ही विमाने पूर्णपणे ‘फिट’ आहेत व काही दिवसांपूर्वी ‘ट्रॉपेक्स २०१७’ या नौदल युद्धसरावातही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती, असे एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने गौरवाने सांगितले.
‘तुपोलेव’ विमाने निवृत्त झाल्यावर त्यांची जागा बोर्इंगच्या ‘पी ८१’ जातीच्या १२ सागरी टेहळणी विमानांचा ताफा घेईल. ही नवी विमाने युद्धनौकाविरोधी ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, हलक्या वजनाचे पाणसुरुंग, अग्निबाण तसेच अतिप्रगत राडार व सेन्सॉरनी सुसज्ज आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)