Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:28 PM2023-02-17T13:28:32+5:302023-02-17T13:29:42+5:30
Turkey-Syria Earthquake: 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारताने तुर्कीची मदत केली, तेथील नागरिकांनीही भारताचे आभार मानले.
Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत 41 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 100 वर्षांतील ही सर्वात मोठी आपत्ती असल्याचे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. तुर्कस्तानला मदत करण्यासाठी जगभरातील देश पुढे आले आहेत. भारतानेही आपले बचाव पथक तुर्कीला पाठवले होते. हे एनडीआरएफचे पथक आज भारतात परतले.
तुर्कस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात मदतीसाठी गेलेले एनडीआरएफचे पथक परतले आहे. एनडीआरएफची टीम तिथून निघाली तेव्हा अडाना विमानतळावरील लोकांनी टाळ्या वाजवून टीमचे आभार मानले. यानंतर, भारतात पोहोचल्यावरही गाझियाबादमधील अधिकाऱ्यांनी एनडीआरएफ टीमच्या सदस्यांचे स्वागत केले.
तुर्कस्तानमध्ये 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत मदत केल्यानंतर एक टीम आज परतली आहे. भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये 10 दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर श्वान पथकातील सदस्य रॅम्बो आणि हनी यांच्यासह एनडीआरएफचे 47 सदस्यीय पथक आज भारतात परतले. ही टीम गाझियाबाद एनडीआरएफ बटालियनमध्ये पोहोचली, जिथे त्यांचे मेडिकल केले जाईल. त्यानंतर दुपारचे जेवण करून ते घरी जातील. तर दुसरी टीम आज संध्याकाळी येईल आणि तिसरी उद्या परत येईल.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपातील मृतांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज म्हणजेच शुक्रवारी हा आकडा 41,000 च्या पुढे गेला आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये आतापर्यंत 38,044 लोकांनी आपला जीव गमावला आहे. भूकंपानंतर भारतासह जगभरातील देश तुर्कस्तानच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी $100 दशलक्ष मदतीचे आवाहन केले.