कॅमेरे सुरू करा, तुम्हाला शेवटचं पाहायचंय! ऑनलाईन क्लासदरम्यान शिक्षिकेनं जीव सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:15 AM2021-11-02T09:15:53+5:302021-11-02T09:16:08+5:30
ऑनलाईन वर्ग सुरू असताना घडला हृदयद्रावक प्रकार; विद्यार्थ्यांवर शोककळा
चेन्नई: केरळमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. कासारगोडमध्ये वास्तव्यास असलेली शिक्षिका ऑनलाईन वर्ग घेत असताना तिची हृदयक्रिया अचानक बंद पडली. असह्य वेदना होऊ लागल्यानं शिक्षिकेनं वर्ग थांबवला आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे कॅमेरे सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर शिक्षिकेनं प्राण सोडला. या घटनेनं परिसरावर शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कासारगोडमध्ये राहत असलेल्या शिक्षिकेला ऑनलाईन वर्ग घेत असताना हृदय विकाराचा त्रास होऊ लागला. असह्य वेदना होत असल्यानं शिक्षिकेची प्रकृती बिघडली. तिनं शिकवणं थांबवलं. मृत्यूची चाहूल लागताच शिक्षिकेनं सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे कॅमेरे ऑन करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांना शेवटचं पाहून शिक्षिकेनं अखेरचा श्वास घेतला. शाळेच्या व्यवस्थापनानं ऑनलाईन वर्गाचं रेकॉर्डिंग पाहिलं. त्यातून ही गोष्ट समोर आली.
कासरगोड जिल्ह्यातील सरकारी कल्याण कनिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीला गणित शिकवणाऱ्या ४७ वर्षीय माधवी गेल्या गुरुवारी ऑनलाईन वर्ग घेत होत्या. मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, खोकला येऊ लागला. त्यानंतर माधवी यांनी विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास दिला आणि वर्ग बंद केला. पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत असलेल्या माधवी वर्ग संपताच बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात नेलं. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
माधवी यांनी घेतलेल्या शेवटच्या ऑनलाईन वर्गाचं फुटेज शाळा प्रशासनानं तपासलं. ते पाहून प्रशासनातील वरिष्ठ अक्षरश: हादरले. माधवी यांच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याचं, त्या अतिशय अस्वस्थ असल्याचं फुटेजमध्ये दिसलं. त्या परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांना कॅमेरा ऑन करण्यास सांगितलं. आपल्या विद्यार्थ्यांना शेवटचं पाहून माधवी यांनी प्राण सोडला.