तुषार मेहता नवे सॉलिसिटर जनरल; भाजपामध्ये मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 05:49 AM2018-10-11T05:49:19+5:302018-10-11T05:49:37+5:30
तुषार मेहता हे गुजराती असल्यामुळे व त्यांनी अनेक संवेदनशील खटले हाताळलेले असल्यामुळे त्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आग्रही होते, असे समजते. तथापि, कोणत्याच नावावर सहमती होत नव्हती व ही नियुक्ती वर्षभरासाठी लांबणीवर पडली होती.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अखेर वर्षभराची प्रतीक्षा संपली असून, मोदी सरकारने सॉलिसिटर जनरल या पदावर तुषार मेहता यांची नियुक्ती केली आहे. मागील चार वर्षांपासून ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर कार्यरत असून, मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये रणजित कुमार यांनी हे पद सोडल्यापासून त्यांचे नाव चर्चेत होते; परंतु रणजित कुमार यांच्यानंतर हे पद कोणाला द्यायचे, यावरून भाजपामध्ये मतभेद असल्याने ही नियुक्ती लांबणीवर पडली होती.
तुषार मेहता हे गुजराती असल्यामुळे व त्यांनी अनेक संवेदनशील खटले हाताळलेले असल्यामुळे त्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आग्रही होते, असे समजते. तथापि, कोणत्याच नावावर सहमती होत नव्हती व ही नियुक्ती वर्षभरासाठी लांबणीवर पडली होती.
रणजित कुमार या पदावरून अचानक पायउतार झाल्यानंतर विधि वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. कारण ते केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या जवळचे समजले जात; परंतु रणजित कुमार यांनी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते पद सोडले होते.
भाजपामध्ये मतभेद
सुप्रीम कोर्टात सरकारचे सहा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत- मनिंदर सिंग, आत्माराम नाडकर्णी, पिंकी आनंद, विक्रमजित बॅनर्जी, अमन लेखी व संदीप सेठी. रणजित कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदावरील नियुक्तीसाठी काही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची नावे चर्चेत होती; परंतु भाजपमध्ये मतभेद असल्यामुळे कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नव्हते.