आयआयटी प्रवेशासाठी बारावीत किमान ७५% गुणांची अट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:22 AM2021-01-08T05:22:25+5:302021-01-08T05:22:41+5:30
केंद्र सरकारचा निर्णय; आता अनेकांना संधी
- एस. के. गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी १२ वीच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
त्यांनी सांगितले की, ३ जुलैला आयआयटी खरगपूर जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे आयोजन करणार आहे. देशातील २३ आयआयटींमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्याला १२ वीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. या अटीमुळे अनेक प्रतिभावंत मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळत नव्हता.
रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षेस देशातून सुमारे आठ लाख विद्यार्थी बसतात. त्यातून जेईई अॅडव्हान्स परीक्षेला बसण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी पात्र ठरविले जातात. देशातील २३ आयआयटीमध्ये २० हजार जागा व एनआयटीमध्ये ५० हजार जागा आहेत. या ७० हजार जागांच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना २० पर्सेंटाइल किंवा बारावीत किमान ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक होते.
मेरिटनुसार प्रवेश
नव्या नियमबदलानुसार जे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना उत्तमोत्तम इंजिनिअरिंग शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला होईल. जेजेई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटच्या आधारे प्रवेश दिला जाईल.