दिल्लीत रेल्वेने रात्री हटविल्या बाराशे झोपड्या
By admin | Published: December 13, 2015 10:33 PM2015-12-13T22:33:35+5:302015-12-13T22:33:35+5:30
दिल्लीतील शकूर झोपडपट्टी भागात रेल्वेने शनिवारी अर्ध्या रात्री अतिक्रमणविरोधी कारवाई करीत सुमारे १,२०० झोपड्या हटविल्या. या कारवाईदरम्यान कथितरीत्या एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला,
नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर झोपडपट्टी भागात रेल्वेने शनिवारी अर्ध्या रात्री अतिक्रमणविरोधी कारवाई करीत सुमारे १,२०० झोपड्या हटविल्या. या कारवाईदरम्यान कथितरीत्या एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर शेकडो कुटुंबांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली. या कारवाईमुळे केजरीवाल सरकार आणि केंद्र यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती उत्पन्न झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईचा निषेध करीत या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे.
याचदरम्यान रेल्वे स्वत:चा बचाव करताना दिसली. शकूर भागातील अतिक्रमणविरोधी कारवाई अनपेक्षित नसल्याचा दावा केला. कारवाईपूर्वी या भागातील नागरिकांना अनेकदा नोटिसा बजाविण्यात आल्याचा शिवाय मृत बालकाचा अतिक्रमणविरोधी कारवाईशी काहीही संबंध नसल्याचे रेल्वेने रविवारी स्पष्ट केले.
पश्चिम दिल्लीतील शकूर झोपडपट्टीवासीय गाढ झोपेत असताना रेल्वे पोलिसांनी अचानक अतिक्रमणविरोधी कारवाईस सुरुवात केली. यावेळी रेल्वे पोलिसांनी १,२०० झोपड्या जमीनदोस्त केल्या. कुठलीही नोटीस न बजावता ही कारवाई करण्यात आल्याचा दावा वस्तीतील नागरिकांनी केला आहे. या कारवाईची माहिती मिळताच रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घटनास्थळी पोहोचले.
बेघर झालेल्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत केजरीवाल यांनी दोन उपविभागीय दंडाधिकारी व अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्यास निलंबितही केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)