मेधा पाटकरांसह बारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:02 AM2017-08-08T04:02:55+5:302017-08-08T04:03:31+5:30
सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला.
रमाकांत पाटील
बडवाणी (मध्य प्रदेश) : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला. या लाठीमारात ४५ जण जखमी झाले आहे.
मेधा पाटकर यांचे चिखलदा येथे आमरण उपोषण सुरू होते. त्यांची व अन्य कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली असताना, पोलिसांनी आज संध्याकाळी तिथे आलेल्या हजारो समर्थकांंना हुसकावण्यासाठी लाठीमार केला आणि ज्या ठिकाणी उपोषण सुरू होते, तो मंडपही तोडून टाकला. उपोषणस्थळाला सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. चिखलदा गाव बडवाणीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात एक हजार ३६६ कुटुंबं राहतात. हे पूर्ण गाव बुडीताखाली येणार आहे. याच ठिकाणी उपोषण सुरू होते.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
आपले अहिंसक आंदोलन पोलिसी बळाने तोडण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारने केला आहे. आमच्याशी लोकांच्या समस्यांबाबत संवाद साधण्याऐवजी मोदी आणि शिवराजसिंग चौहान सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला. म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे हे नेते कसे वागतात, हे या निमित्ताने लोकांपुढे आले आहे.