बिहारमधील पूरग्रस्तांच्या साह्यासाठी एनडीआरएफची वीस पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:34 AM2019-10-02T04:34:14+5:302019-10-02T04:34:40+5:30
गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे.
पाटणा - गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या राज्यात केंद्र सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफची वीस पथके पाठविली आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनाही बचावकार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. पुनर्वसन व मदत यात सरकारकडून होणाऱ्या विलंबामुळे लोक संतप्त झाले आहेत. पाटण्याच्या सरकारी रुग्णालयातही तीन फुटांहून अधिक पाणी आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे (एनसीएमसी) अध्यक्ष व कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बिहारमधीलपूरस्थितीचा दिल्लीत मंगळवारी झालेल्या एका बैठकीत आढावा घेतला. एनडीआरएफच्या वीस पथकांमध्ये ९०० जवानांचा समावेश आहे. त्यातील सहा पथके पाटणा येथे पाठविण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पाटण्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाटणा येथे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार ज्यादा क्षमतेचे पंप केंद्रीय कोळसा खात्याने पाठविले आहेत. यापैकी प्रत्येक पंप दर मिनिटाला तीन हजार गॅलन पाण्याचा उपसा करू शकतो. पूरग्रस्त भागांमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट व्हावा म्हणून बिहार सरकारने योग्य पावले उचलली आहेत. बिहारमध्ये संततधारेचा जोर येत्या काही दिवसांत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या तांडवामुळे गेल्या चार दिवसांत बिहारमध्ये २८ जणांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)
बंगालच्या माल्दा जिल्ह्यातही हाहाकार
मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा तडाखा तेथील अडीच लाख लोकांना बसला आहे. या जिल्ह्यातील सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. गंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक घरे वाहून गेली आहेत.
पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात एनडीआरएफचे पथक, तसेच स्थानिक पोलीस सहभागी झाले आहेत.