कहानी में ट्विस्ट..! नायब सिंह हरयाणाचे नवे मुख्यमंत्री, माजी CM मनोहरलाल खट्टर काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:48 PM2024-03-12T15:48:10+5:302024-03-12T15:48:49+5:30
हरयाणातून काय आहे भाजपाचं प्लॅनिंग, जाणून घ्या
Manohar Lal Khattar BJP Haryana Politics: गेल्या काही महिन्यांत भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये सरकार कोसळून तेथे भाजपाची सत्ता आल्याचे पाहायला मिळाले. पण आज, मंगळवारी हरियाणामध्ये एक वेगळेच चित्र दिसले. भाजपा आणि जेपीपी यांची हरियाणात सत्ता होती. पण भाजपाने जेपीपीची तडकाफडकी साथ सोडली. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या भाजप मंत्र्यांसह राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि आता भाजपा ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर नवे सरकार स्थापन करत आहे. पण यात 'कहानी में ट्विस्ट' म्हणजे नव्या सरकारमध्ये नायब सिंग हे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे आता मनोहर लाल खट्टर काय करणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. जाणून घेऊया भाजपाचं 'प्लॅनिंग'.
हरियाणाच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर नायब सिंग सैनी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. कारण आता खट्टर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळात भाजप लोकसभा निवडणुकीसाठी आणखी उमेदवारांची यादी जाहीर करेल, ज्यामध्ये मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. खट्टर हरियाणातील कर्नाल मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
आरएसएसचे माजी प्रचारक मनोहर लाल खट्टर हे हरियाणाचे दहावे मुख्यमंत्री होते. 2014 मध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाती घेतला. त्यानंतर सलग दहा वर्षे ते मुख्यमंत्रीपदावर राहिले. 2000 ते 2014 दरम्यान, खट्टर हे हरियाणात भाजपचे संघटना सरचिटणीसही होते. त्याच वेळी, 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, खट्टर यांना भाजपच्या हरियाणातील निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख देखील बनवण्यात आले होते. खट्टर हे कर्नाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत कर्नालची जागा भाजपकडे होती. ही जागा 2014 मध्ये अश्विनी चोप्रा आणि त्यानंतर 2019 मध्ये संजय भाटिया यांनी जिंकली होती. अशा वेळी त्यांना आता याच मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते.