‘ट्विटर’ला वाटतेय भीती... केंद्राच्या नव्या नियमांना तात्त्विक विरोध   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:26 AM2021-05-28T06:26:49+5:302021-05-28T06:27:59+5:30

Twitter News: ट्विटरने टूलकिटप्रकरणातील सर्व ट्विट्सना ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’, असा टॅग लावल्याने केंद्र नाराज झाले आहे.

‘Twitter’ feels fear ... philosophical opposition to the Centre’s new rules | ‘ट्विटर’ला वाटतेय भीती... केंद्राच्या नव्या नियमांना तात्त्विक विरोध   

‘ट्विटर’ला वाटतेय भीती... केंद्राच्या नव्या नियमांना तात्त्विक विरोध   

Next

नवी दिल्ली - काँग्रेसच्या कथित टूलकिट प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात बेबनाव निर्माण झाला आहे. ट्विटरने टूलकिटप्रकरणातील सर्व ट्विट्सना ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’, असा टॅग लावल्याने केंद्र नाराज झाले आहे. त्यातच आता माहिती-तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांनाही ट्विटरने तात्त्विक विरोध दर्शवला आहे. 

आपल्या विरोधी भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांना त्रास दिला जाईल, अशी भीतीही ट्विटरला सतावते आहे. टि्वटरने म्हटले आहे की, भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही एक उत्तम व्यासपीठ लोकांना उपलब्ध करून दिले आहे.  भारतीयांशी आमचे घट्ट नाते जुळले आहे. हे नाते अतूट राहण्यासाठी आम्ही देशातील सर्व लागू कायद्यांचे पालन करू. परंतु, आम्ही पारदर्शकतेच्या नियमांचेही काटेकोर पालन करण्याला प्राधान्य देऊ. आमच्या वापरकर्त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 

कर्मचाऱ्यांची चिंता
सद्य:स्थितीत भारतातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता वाटत असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही ज्या लोकांना सेवा देतो त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार असल्याची भीती आम्हाला वाटत आहे. 
आम्हाला पोलिसी धाकदपटशहाला सामोरे जावे लागेल, अशीही भीती वाटते. सर्व विषयांवर खुली चर्चा व्हावी, असा आमचा आग्रह असतो. त्यालाच नेमका विरोध होत आहे. या सगळ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करत असून ही प्रक्रिया यापुढेही सुरूच राहील, असेही ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

वाद काय? 
कोरोनाकहरात केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी 
काँग्रेसने टूलकिट तयार केले
या टूलकिटचा वापर करत ट्विटरच्या माध्यमातून देशाची बदनामी करणारे ट्विट्स केले गेले, असा केंद्राचा दावा आहे
मात्र, ट्विटरने हा दावा खोडून काढत भाजपचे प्रवक्ते सम्बित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला
तसेच टूलकिटसंदर्भातील सर्व ट्विट्स ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ म्हणून टॅग केले 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता
तसेच केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सहानुभूती दर्शवणारे ट्विट्स हटवले जावेत, या केंद्र सरकारच्या आदेशाला ट्विटरने जुमानले नव्हते
या सर्व कारणांमुळे ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात बेबनाव आहे 

ट्विटरची भूमिका 
नव्या नियमावलीला ट्विटरने विरोध दर्शवला आहे.
नव्या नियमावलीमुळे लोकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.
कोरोना साथरोगाच्या काळात आमच्या मंचाच्या माध्यमातून अनेक भारतीय वापरकर्त्यांनी त्यांचे मन मोकळे केले.

Web Title: ‘Twitter’ feels fear ... philosophical opposition to the Centre’s new rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.