उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट Unverified; ब्लू टिक हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 10:19 AM2021-06-05T10:19:07+5:302021-06-05T10:21:11+5:30
ट्विटरवर अनेकांकडून संताप व्यक्त; भाजप नेत्यांचं ट्विटरवर टीकास्त्र
नवी दिल्ली: टूलकिट वादामुळे चर्चेत आलेल्या ट्विटरनं आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हँडलवरील ब्लू टिक हटवली आहे. महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या अकाऊंटला ट्विटरकडून ब्लू टिक दिली जाते. याचा अर्थ ते अकाऊंट व्हेरिफाईड आहे असा होतो. मात्र ट्विटरनं व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटवरील ब्लू टिक काढली आहे. ही माहिती समजताच अनेकांनी ट्विटरवरच आपला रोष व्यक्त केला.
ट्विटरनं उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक कशी काढली? हा भारतीय घटनेवरील हल्ला आहे, अशी संतप्त भावना भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुवा यांनी व्यक्त केली. मात्र काही ट्विटर वापरकर्त्यांच्या मते, नायडूंचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ते अनव्हेरिफाईड करण्यात आलं असावं.
Twitter withdraws blue verified badge from personal Twitter handle of Vice President of India, M Venkaiah Naidu: Office of Vice President pic.twitter.com/vT8EZ5O9Na
— ANI (@ANI) June 5, 2021
कोणत्या स्थितीत हटवली जाते ब्लू टिक?
ट्विटरच्या अटींनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या हँडलचं नाव (@handle) बदलते किंवा एखादं अकाऊंट बऱ्याच दिवसांपासून निष्क्रिय असतं किंवा ट्विटरनं ज्या कारणासाठी अकाऊंट व्हेरिफाय ते कारणच आता अस्तित्वात नसल्यास ब्लू टिक हटवली जाते. व्यंकय्या नायडूंकडून उपराष्ट्रपतींचं ट्विटर हँडल वापरलं जातं. त्यावरील ब्लू टिक कायम आहे.
ट्विटर वि. भारत सरकार संघर्ष
सरकारच्या नव्या नियमावलीमुळे ट्विटर आणि सरकार आमनेसामने आल्यासारखी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत हा वाद वाढला आहे. नव्या नियमावलीबद्दल ट्विटर फारसं अनुकूल नाही. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी ट्विटरवरील काही मजकूराबद्दल आक्षेप नोंदवत ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयांवर छापे टाकले होते.