ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालकांची चौकशी; पात्रांचे ट्वीट केले होते ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ टॅग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:45 AM2021-06-18T05:45:21+5:302021-06-18T05:46:00+5:30
केंद्र सरकारने कोविड-१९ महामारीच्या केलेल्या हाताळणीवरून सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केले, असा आरोप संबित पात्रा यांनी ट्विटरवर केल्यापासून हा विषय सुरू झाला. नंतर ट्विटरने संबित पात्रा यांचे ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ म्हणून टॅग केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ असे टॅग केल्यावरून दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना प्रश्न विचारले, असे सूत्रांनी सांगितले. या वर्षाच्या प्रारंभी दिल्ली पोलिसांनी ‘काँग्रेस टूलकिट’ म्हणून समोर आलेल्या प्रकरणात चौकशी सुरू केली होती.
केंद्र सरकारने कोविड-१९ महामारीच्या केलेल्या हाताळणीवरून सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केले, असा आरोप संबित पात्रा यांनी ट्विटरवर केल्यापासून हा विषय सुरू झाला. नंतर ट्विटरने संबित पात्रा यांचे ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ म्हणून टॅग केले.
दिल्ली पोलिसांची तुकडी गेल्या ३१ मे रोजी बंगळुरूला माहेश्वरी यांना या प्रकरणी प्रश्न विचारण्यासाठी गेली होती. दिल्ली पोलीस करीत असलेली चौकशी ट्विटर इंडियाचे अमेरिकास्थित मुख्य कंपनीशी (पॅरेंट कंपनी) असलेले संबंधच सिद्ध करीत नाही तर भारतीय कायदा राबवणाऱ्या यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी कंपनीच्या आडून गुप्तपणे चालणाऱ्या कारवायाही उघडकीस आणत आहे. काँग्रेसच्या कथित टूलकिटवर संबित पात्रा यांनी केलेले ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ असे का टॅग केले गेले, याचा तपशील मागणारी नोटीस दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला दिली होती.
घटना, नियमांचे पालन करावे लागेल - प्रसाद
n भारतीय कंपन्या व्यवसाय करतात, औषध कंपन्या अमेरिकेत जाऊन उत्पादन करतात तेव्हा अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करतात की नाही? तुम्हाला भारतात व्यवसाय करायचा आहे, पंतप्रधान आणि आम्हा सगळ्यांवर टीका करण्यासाठी तुमचे स्वागत आहे. परंतु, तुम्हाला भारताची घटना आणि नियमांचे पालन करावे लागेल, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले.
n भारतात १०० कोटींपेक्षा जास्त लोक समाज माध्यमांना वापरतात. मला आनंद आहे. त्यांना पैसा कमवू द्या. युझर्सना आमच्यावर टीका करू द्या, त्यांचे खूप स्वागत आहे. परंतु, जेव्हा या नफा कमावणाऱ्या कंपन्या आम्हाला लोकशाहीबद्दल धडे देऊ लागतात तेव्हा मला प्रश्न विचारायला आवडेल, असे प्रसाद म्हणाले.