"साहेब गोळी मारू नका, मी...", हातात पोस्टर घेऊन मारेकऱ्यांची पोलीस ठाण्यात हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:36 PM2023-06-20T14:36:04+5:302023-06-20T14:36:52+5:30
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील दोन आरोपींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील दोन आरोपींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. येथील करिया हत्याकाडांतील दोन मारेकऱ्यांनी हातात पोस्टर घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. या आरोपींनी झळकवलेल्या पोस्टरमध्ये लिहले, "साहेब गोळी मारू नका, मी स्वत: हजर झालो आहे." खरं तर पोलिसांच्या कडक कारवाईच्या भीतीने रामावतार आणि राम वर्मा यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक प्राची सिंग यांच्या टीमकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, १३ जून २०२३ रोजी कोतवाली भिनागा पोलीस स्टेशन परिसरातील सेमीरीचक पिहाणी गावात जुन्या वादातून दोन गटामध्ये भांडण झाले होते. यावेळी माता प्रसाद उर्फ कारिया नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली, ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, सोहन लाल वर्मा, सुरेंद्र बहादुर, पंकज वर्मा, लाल वर्मा, अनूप वर्मा आणि राधेश्याम यांच्याविरोधात सेमरीचक पिहाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या भीतीने केले आत्मसमर्पण
पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली असता पोलिसांच्या पथकाला आरोपींची माहिती मिळाली. मग पोलिसांनी सोहनलाल, सुरेन्द्र बहादुर, पंकज वर्मा, अनोखी लाल वर्मा, अनूप वर्मा आणि राधेश्याम यांना अटक केली. या अटकेची माहिती माहिती मिळताच रामावतार आणि राम वर्मा यांनी पोलिसांची धास्ती घेतली आणि स्वत:हून पोलिसांना आत्मसमर्पण केले.