करणी सेनेच्या गोगामेडींची हत्या करणारे दोन आरोपी अटकेत, पोलिसांनी मदत करणाऱ्यालाही ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:42 AM2023-12-10T09:42:28+5:302023-12-10T09:43:10+5:30
Sukhdev Singh Gogamedi: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांडामध्ये सहभागी असलेले दोन आरोपी नितीन फौजी आणि रोहित सिंह राठोड यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या उधम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची राहत्या घरी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या हत्याकांडामध्ये सहभागी असलेले दोन आरोपी नितीन फौजी आणि रोहित सिंह राठोड यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या उधम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या तिघांनाही शनिवारी रात्री चंडीगडमधील एका दारूच्या गुत्त्याजवळून अटक केली आहे. फौजी आणि राठोड यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि राजस्थान पोलिसांच्या एसआयटीने संयुक्त मोहीम राबवली होती. ही संपूर्ण कारवाई एडीजी क्राईम दिनेश एमएन आणि पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांनी फौजी आणि राठोड यांना अटक करण्यापूर्वी ९ डिसेंबररोजी संध्याकाळी त्यांचा सहकारी रामवीर जाट याला बेड्या ठोकल्या होत्या. रामवीर हा हरियाणामधील महेंद्रगड येथील रहिवासी आहे. त्यानेच सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर आरोपींना जयपूर येथून पळून जाण्यास मदत केली होती. रामवीरने बगरू टोल प्लाझा येथून दोन्ही शूटर्सना बसमध्ये बसवले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. तसेच रामवीरनेच आरोपींची जयपूरमधील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. रामवीर आणि नितीन फौजी यांच्यात मैत्री असून, दोघांचेही गाव जवळच आहेत. दोघेही बारावीपर्यंत एकत्र शिकले होते. तर बारावी पास झाल्यानंतर नितीन सैन्यात भरती झाला होता.
गेल्या मंगळवारी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची नितीन आणि रोहीत याने त्यांच्या घरात घुसून हत्या केली होती. त्यानंतर ते फरार झाले होते. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यानंतर राजस्थानसोबत संपूर्ण देशात खळबळ उडाली. ६ डिसेंबर रोजी राजस्थान बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे या हत्येविरोधात अनेक राज्यांमध्ये तीव्र आंदोलन झालं होंत. तसेच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही शूटर्सवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. तसेच आरोपींना ७२ तासांमध्ये अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले होते.