बुलेटच्या एका चाकावर अडीच किमीचा प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 06:27 AM2022-12-18T06:27:54+5:302022-12-18T06:28:00+5:30
हरयाणातील मनीष राठींचे नाव गिनिज बुकमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडिगड : हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील जिंदरान गावातील मनीष राठी यांनी दुचाकीवर स्टंट करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला ठसा उमटविला आहे. बंगळुरुत बुलेटच्या मागील सीटवर बसून त्यांनी पुढील चाक हवेत ठेवत एकाच चाकावर अडीच किमीचा प्रवास केला. मागील सीटवर बसून इतका मोठा प्रवास केल्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मनीष राठी यांनी केलेल्या उपक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन
मनीष राठी हे २०११ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. सध्या ते हवालदार पदावर कार्यरत आहेत. मोटारसायकलवर स्टंट करण्याचा छंद असणाऱ्या मनीष यांना सैन्य अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये भारतीय सैन्याच्या स्टंट टीममध्ये सहभागी करून घेतले. सततच्या सरावाने मनीष यांनी स्वत:ला एक उत्कृष्ट स्टंटमॅन म्हणून सिद्ध केले आहे. मनीष यांच्यातील सुप्तगुणांना या ठिकाणी अधिक वाव मिळाला. सैन्यातील अधिकाऱ्यांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे ते आज इथपर्यंतचा पल्ला गाठू शकले आहेत.
मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान
मनीष यांच्या आई राजवंती म्हणतात की, माझा मुलगा जेव्हा शेतात जात होता, तेव्हा तो दुचाकीवर स्टंट करत होता. सैन्यात भरती झाल्यानंतर दुचाकीवर स्टंट करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. मनीष यांचे वडील धर्मबीर सिंह म्हणतात की, मुलाच्या या कर्तृत्वाने अभिमानाने छाती फुलून आली. मुलाने केवळ हरयाणाचेच नाही, तर देशाचे नाव जगात मोठे केले आहे.