कुमारस्वामी आणि देवेगौडांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 04:48 PM2019-06-11T16:48:31+5:302019-06-11T16:50:29+5:30
फेसबूक लाइव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
बंगळुरू - फेसबूक लाइव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. सिद्धराजू आणि जौमराजू अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. दरम्यान, कर्नाटकमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मात्र या अटकेच्या कारवाईला विरोध केला आहे.
अटक केलेल्या व्यक्तींनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर फेसबूक लाइव्ह केले होते. फेसबूक लाइव्हदरम्यान त्यांनी एच.डी. कुमारस्वामी, एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामींचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या दोघांना अकट केली आहे. तसेच संबंधित फेसबूक लाइव्हचा व्हिडिओसुद्धा डिलीट करण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने एका पत्रकाराला अटक केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारत पत्रकार प्रशांत कनौजिया यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशमधील पत्रकार अटक प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. तसेच योगी आदित्यनाथ हे मुर्खपणाचे काम करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र आता कर्नाटकमध्ये झालेल्या अटक प्रकरणावरून भाजपाने राहुल गांधी यांना प्रतिटोला लगावला आहे. कुमारस्वामी, अण्णा, तुमचे मित्र राहुल गांधी म्हणतात की तुमच्याविरोधात मिम, ब्लॉग लिहिणाऱ्यांना अटक करणे हा मुर्खपणा आहे. मात्र ते तुमचे नाव घेण्यास घाबरत आहेत. तुमचे नाव घेतल्यास तुम्ही नाराज होऊन आघाडीतून बाहेर पडाल आणि कर्नाटकमधूनही त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, अशी त्यांना भीती वाटते, असा टोला भाजपाने राहुल गांधी यांचे ट्विट रिट्विट करून लगावला आहे.