मणिपूर बॉम्ब हल्ल्यात आसाम रायफल्सच्या दोन जवानांचा मृत्यू, सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 03:48 PM2017-11-13T15:48:58+5:302017-11-13T16:46:32+5:30
मणिपूर- म्यानमार सीमेवरील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन आसाम रायफल्सच्या जवानांचा मृत्यू झाला
मणिपूर- म्यानमार सीमेवरील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन आसाम रायफल्सच्या जवानांचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी आहेत. सकाळी 6.20च्या सुमारास आसाम रायफल्स 18चे जवान दक्षिण इम्फाळमधल्या 65 किलोमीटर अंतरावरील महामणी गावातल्या रस्त्यावरून जात होते.
त्याच वेळी दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानकपणे बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक जवान गंभीररीत्या जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. जखमी जवानांना लष्कराच्या लेइमखोंग या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. हा बॉम्ब रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आला होता. अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही.
तीन वर्षांपूर्वीसुद्धा मणिपूरची राजधानी इम्फाळच्या खोयाथोंग भागात शक्तिशाली आयईडी (इन्टेन्सिव्ह एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस)च्या स्फोटात तीन मजूर ठार आणि चार जखमी झाले होते. परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
आयईडीचा वापर केलेला हा बॉम्ब इम्फाळमधील बाजारपेठेजवळच्या रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता. परप्रांतातून मजुरीसाठी आलेले तिघे त्यात जागीच ठार झाले, तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकही मजूर मणिपुरी नाही. ते खोयाथोंग येथे एका दुकानात चहा घेण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. राज्यात या वर्षी बिगर मणिपुरी लोकांवर अनेकदा हल्ले झालेत आणि त्यात नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत.