सीमेवर घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळले
By admin | Published: September 23, 2016 01:39 AM2016-09-23T01:39:43+5:302016-09-23T01:39:43+5:30
पाकव्याप्त काश्मिरातून काश्मिरात घुसखोरी करण्याचे अतिरेक्यांचे दोन प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडले. उरी आणि नौगाम भागात घुसखोरीचे प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे
श्रीनगर : पाकव्याप्त काश्मिरातून काश्मिरात घुसखोरी करण्याचे अतिरेक्यांचे दोन प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडले. उरी आणि नौगाम भागात घुसखोरीचे प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नौगामच्या दोन वेगवेगळ्या भागांत घुसखोरीचे प्रयत्न उधळण्यात आले. या मोहिमेत दोन दिवसांत सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. उरीतील मोहिमेत किमान आठ अतिरेकी मारले गेले असल्याचा दावा करण्यात येत आहे, पण अद्याप हे मृतदेह सापडलेले नाहीत. नियंत्रण रेषेजवळून घुसखोरी वाढल्याने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुरुवारी दोन ठिकाणांहून घुसखोरीचा प्रयत्न झाला, पण सुरक्षा दलाने ही घुसखोरी रोखली.
पॅलेट गनवर बंदीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळलीहिंसक जमावाविरुद्ध बळाचा वापर क्रमप्राप्त असल्याचे सांगून, काश्मिरात निदर्शकांविरुद्ध ‘पॅलेट गन’ वापरण्यास बंदी घालण्याची मागणी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या उच्च न्यायालय वकील संघाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हिंसक निदर्शकांवर पॅलेट गन चालविण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला चालविण्याची विनंती मान्य करण्यासही मुख्य न्यायाधीश एन. पॉल. वसंतकुमार आणि न्यायमूर्ती अली मोहंमद मार्गे यांच्या खंडपीठाने नकार दिला.
काश्मिरातील स्थिती व गृहमंत्रालयाने पॅलेट गनला पर्याय शोधण्यासाठी विशेष समितीची स्थापना केल्याच्या पार्श्वभूमीवर, तिला निर्णय घेण्यापूर्वी पॅलेट गनवर बंदी घालणे योग्य वाटत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मदनलाल यांना श्रद्धांजली भारतीय सैन्याने गुरुवारी शहीद हवालदार मदनलाल (३७) यांना श्रद्धांजली अर्पण केली. उत्तर काश्मिरात नौगाम भागात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांशी दोन हात करताना हवालदार मदनलाल हे शहीद झाले. त्यांनी आपल्या तुकडीचे नेतृत्व केले होते. मंगळवारी सैन्याने नौगाम आणि उरी येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता.
उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाने चकमकीत एका अतिरेक्याला ठार मारले. बांदीपोरातील अरगाम गावात अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाने या भागाला घेरले. या वेळी या अतिरेक्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर, झालेल्या चकमकीत आतापर्यंत एक अतिरेकी मारला गेला आहे. या भागातून हत्यारेही जप्त करण्यात आली.