दारात पडलेली चॉकलेट्स खाताच चार चिमुरड्यांचा मृत्यू; आईसमोरच थांबला मुलांचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:55 AM2022-03-24T11:55:45+5:302022-03-24T11:56:00+5:30
घरासमोर पडलेली चॉकलेट्स खाल्ल्यानं चौघांचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
कुशीनगर: उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. विषारी चॉकलेट्स खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील चार चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आईच्या समोरच मुलांनी जीव सोडला. त्यानंतर रडून रडून आईची अवस्था दयनीय झाली आहे.
सकाळी सात वाजता मुलांना जाग आली. मुलं उठून घराबाहेर आली. घराच्या बाहेर त्यांना काही चॉकलेट्स आणि नाणी दिसली. मुलांनी चॉकलेट्स उचलली आणि खाल्ली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत मुलं बेशुद्ध होऊन कोसळली. त्यानंतर मुलांना तातडीनं रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र रस्त्यातच त्यांचं निधन झालं.
घराबाहेर पडलेली चॉकलेट्स अतिशय विषारी होती. चॉकलेट्सच्या वेष्टनावर बसलेल्या माशादेखील मरून पडल्या. चॉकलेटच्या वेष्टनावर गोल्ड आलमंड चॉकलेट डिलाईट असा उल्लेख होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. श्वान पथकाच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. पोलीस श्वान पथकाला घेऊन घटनास्थळी पोहोचले. तिथून श्वान थेट आरोपींच्या घरी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. संजना (६), स्विटी (३), समर (२) आणि आरुष (५) अशी मृत मुलांची नावं आहेत.