पंतप्रधान मोदी व नितीश कुमारांचं त्या 2 फोन कॉल्समुळे पुनर्मिलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 09:15 AM2017-07-28T09:15:40+5:302017-07-28T09:27:38+5:30
भाजपा व जेडीयू यांचे पुनर्मिलन होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात झालेल्या दोन फोन कॉल्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पाटणा, दि. 28 - भाजपा व जेडीयू यांचे पुनर्मिलन होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात झालेल्या दोन फोन कॉल्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लालू प्रसाद यादव अडचणीत सापडणार याचा अंदाज व भाजपासोबत युती करण्यासंदर्भातील सकारात्मक गोष्टींमुळे नितीश कुमार यांना हा निर्णय घेण्यास प्रेरित केले. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणा-या निधीवरुन राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी सध्या केली जात आहे, तेथे बिहारकडे आता केंद्र पूर्णतः लक्ष देईल, असे म्हटले जात आहे.
''बिहार निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी घोषणा केलेले 1 लाख पंचवीस हजार कोटींचे ‘पॅकेज’ आता बिहारला मिळेल, याविषयी अजिबात शंका नाही'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनीही सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. दरम्यान, जेडीयूला केंद्रीय मंत्रिमंडळात किती जागा मिळणार आहेत, याबाबतचा निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही. बिहारमधील शासन सध्या रुळावर आणण्यावर सर्व लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे.
'इकोनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व घडामोडींदरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारमधील अधिका-यांनी भाजपा-जेडीयू नेत्यांसोबत संवाद साधला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांच्यात बोलणी झाली. नितीश कुमार यांनी बुधवारी रात्री 8.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी दर्शवलेल्या समर्थनाबाबत आभार व्यक्त केले. याआधी 1 तासापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन सांगितले होते की, देशातील जनता नितीश यांच्या बाजूने आहेत. दोन्ही पार्टीतील नेत्यांनी सांगितले की, फोनवर संक्षिप्त मात्र सौहार्दपूर्ण संवाद झाला. 'इकोनॉमिक्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर 2016 रोजी नितीश कुमार यांना फोन करुन नोटाबंदी निर्णयाला पाठिंबा दर्शवल्याबाबत त्यांचे फोनवरुन आभार मानले होते, ही माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये विकासासंदर्भातील विचार एकसारखे आहेत. आणखी एका नेत्याचे असे म्हणणे आहे की, 20 वर्षांमध्ये पहिल्यांदा केंद्र व पाटणामध्ये युतीतील सरकार असणार आहे, ज्याचे थेट नाते विकासासोबत असेल. ''पंतप्रधान मोदी व नितीश कुमार दोघंही विकासावर विश्वास ठेवतात. आगामी काळात जर केंद्राच्या योजनासंबंधीच्या यशोगाथा बिहारमधून आल्यास यात आश्चर्य असे काही वाटू नये. पंतप्रधानांना हेच हवे आहे'', असे केंद्रातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. तर नितीश यांनी 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. अधिका-यांनी सांगितले की या विनंतीवर गांभीर्यानं दखल घेऊन निर्णय घेतला जाईल. सोबत केंद्र सरकारलाही अशी अपेक्षा आहे की पंतप्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधानमंत्री पीकविमा योजना यांसारख्या योजनांमध्ये बिहार पुढे येईल.