खडसेंना धमकीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आठ दिवसानंतर गुन्हा दाखल : दोघंही तरुण शिवसेनेचे कार्यकर्ते
By admin | Published: February 22, 2016 12:04 AM2016-02-22T00:04:05+5:302016-02-22T00:07:17+5:30
जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन धमकी दिल्याच्या प्रकरणात दोघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन धमकी दिल्याच्या प्रकरणात रविवारी सुनील पाटील (रा.मुक्ताईनगर) व आनंद पाटील (रा.जळगाव) या दोघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हा चिटणीस भरत तोताराम महाजन (रा.फैजपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील सुनील पाटील हा मुक्ताईनगर येथील शिवसेनेचा कार्यकर्ता तर आनंद पाटील हा मू.जे.महाविद्यालाचा विद्यार्थी आहे.तो शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची नेमकी ओळख स्पष्ट झालेली नाही. सुनील याचा तो फेसबुकवरील मित्र आहे, इतकेच सध्या तरी पुढे आलेले आहे. दरम्यान,१२ व १३ फेब्रुवारी रोजी या दोघांनी फेसबुकवर खडसे यांच्याविरुध्द आक्षेपार्ह मजकुर पोस्ट करुन त्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी भाजप पदाधिकार्यांनी कारवाईच्या मागणीसाठी पोलीस अधिकारी व तहसीलदारांकडे जिल्हाभर आंदोलने करुन निवेदने दिली होती.
चंदेल यांनी स्वत:कडेच ठेवला तपास
पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. आठवडाभराच्या चौकशीअंती रविवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला भादवि कलम १५३ (अ),१२० (ब), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी स्वत:कडेच घेतला आहे.
खडसे यांच्याविषयी सोशय मिडियावर आक्षेपार्ह मजकुर अपलोड करण्याची ही तिसरी वेळ आहे. चार महिन्यापूर्वीही त्यांच्या आजारपणाविषयी तसेच बदनामीकारक पोस्ट व्हायरल झाली होती. तर त्याआधी देखील त्यांच्या कार्यक्षमतेविषयी व मुख्यमंत्री पदाबाबत फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आली होती. दोन्ही वेळा भाजपच्या पदाधिकार्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. एका प्रकरणात अमळनेर, रावेर व भुसावळ येथील महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आढळून आला होता. तेव्हा त्यांच्या पालकांनी खडसे यांची भेट घेवून माफी मागितल्याने वाद मिटला होता.