सात तास कारमध्ये अडकल्याने दोन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू; दिल्लीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 02:19 PM2017-10-07T14:19:02+5:302017-10-07T14:22:34+5:30
कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली- कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कॅब चालकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. दिल्लीमध्ये ही घडली आहे. बुधवारी दुपारी हा कॅब चालक कॅब घराबाहेर पार्क करून घरात गेला होता. घरात गेल्यावर कार लॉक केली नसल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने घरातूनच रिमोटने कार लॉक केली. पण तोपर्यंत त्याचा मुलगा आणि भाचा कारमध्ये खेळायला गेले होते. मुलगा आणि भाचा कारमध्ये खेळायला गेल्याचं कॅब चालकाला माहिती नव्हतं. पण इकडे तब्बल सात तास कारमध्येच राहिल्याने या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
आऊटर दिल्लीच्या रणहोला परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. राजू असं या कॅब चालकाचं नाव आहे. तो बुधवारी दुपारी कॅब घेऊन घरी आला होता. घराबाहेर कार उभी करून तो घरात गेला. घरात वरच्या मजल्यावर गेल्यावर कार लॉक करायला विसरून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने वरूनच रिमोटने कार बंद केली. याच दरम्यान त्याचा मुलगा सोनू (वय ४) आणि त्याचा भाचा राज ( वय ६) हे दोघेही खेळताखेळता कारमध्ये गेले होते. कारमध्ये एसी सुरूच होता. त्यामुळे या मुलांना कारमध्ये झोप लागली. कार लॉक केल्यावर एसी बंद झाला. त्यानंतर सात तास कार न उघडल्याने त्यांचा कारमध्येच गुदमरून मृत्यू झाला. दुसरीकडे मुलं दिसत नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.
मुलांना शोधण्यासाठी पालकांनी पोलिसांचीही मदत घेतली. अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही मुलांचा शोध घ्यायला सुरूवात केली. आजूबाजूच्या परिसरात मुलांचा शोध घेण्यात आला. पण तरीही मुलं सापडली नाही. शेवटी सात तासानंतर कारने बाहेर जाऊन मुलांना शोधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कारचा दरवाजा उघडताच दोन्ही मुलं कारच्या सीटवरून खाली पडलेली दिसली. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं पण त्या मुलांचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदनानंतर या दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या मात्यापित्यांकडे सोपविण्यात आले आहेत. राजू हा बिहारचा रहिवासी आहे. या घटनेनंतर राजू आणि त्याचे कुटुंबीय बिहारला गेले आहेत. पोलिसांनी ही कॅब सीएफएसएलकडे तपासासाठी पाठविली आहे.