ड्रॅगनच्या कुरघोड्या सुरुच; चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सची भारतीय हद्दीत घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:27 AM2018-10-25T10:27:11+5:302018-10-25T10:34:58+5:30
चिनी हेलिकॉप्टर्स जवळपास 10 मिनिटं भारतीय हद्दीत
नवी दिल्ली: चिनी हेलिकॉप्टर्सनं भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती समोर आली आहे. 27 सप्टेंबरला चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी लडाखमध्ये घुसखोरी केली होती. जवळपास 10 मिनिटं ही हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई हद्दीत होती. यानंतर ती चीनच्या दिशेनं परतली. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याआधी अनेकदा चीनच्या सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची दोन हेलिकॉप्टर्स 27 सप्टेंबरला लडाखच्या ट्रिग हाईट्स परिसरात घुसली होती. दोन्ही हेलिकॉप्टर्स 10 मिनिटं भारताच्या हवाई हद्दीत घिरट्या घालत होती. त्यानंतर ती पुन्हा चीनकडे रवाना झाली. याआधीही चीनची हेलिकॉप्टर्सनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मार्चमध्ये चारवेळा चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत आल्याचं गुप्तचर खात्याच्या अहवालातून समोर आलं होतं.
Aerial transgression by two Chinese helicopters took place on September 27 in Ladakh Trig Heights. Both the helicopters remained in Indian territory for about ten minutes and then went back: Sources
— ANI (@ANI) October 25, 2018
काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशात चिनी लष्कराच्या जवावांनी घुसखोरी केली होती. चिनी लष्करानं सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. यानंतर भारतीय जवानांनी विरोध दर्शवताच त्यांनी माघार घेतली. याच महिन्यात ही घटना घडली होती. याआधी मार्च महिन्यात उत्तराखंडमधील बाराहोती, ट्रिग हाईट्स आणि लडाखमधील देप्सांग खोऱ्यात चिनी जवानांनी घुसखोरी केली होती. तर ऑगस्टमध्ये चिनी सैनिकांनी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती.