दोन दलित अल्पवयीनांची जमावाने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:42 AM2019-09-26T02:42:49+5:302019-09-26T06:56:44+5:30
उघड्यावर शौचास बसल्याने हत्या
शिवपुरी : मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये भावखेडी गावात उघड्यावर शौचाला बसल्याची शिक्षा म्हणून दोन दलित अल्पवयीनांची बुधवारी सकाळी हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याच गावातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
हत्या करण्यात आलेल्यांमध्ये एक मुलगा व एक मुलगी, असून त्यांचे वय अनुक्रमे १० व १२ वर्षे आहे. हे भीषण कृत्य करणाऱ्या हकीम यादव व रामेश्वर यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील एका आरोपीने सांगितले की, या दोन अल्पवयीनांची हत्या करण्यापूर्वी मोबाईलमधून त्यांची छायाचित्रे काढली होती. देवाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सैतानांना ठार मारले, असे निर्लज्ज समर्थन या प्रकरणातील आरोपीने पोलिसांकडे केले आहे.
सिरसोड पोलीस ठाण्याचे प्रमुख आर.एस. धाकड यांनी सांगितले की, भावखेडी गावातील पंचायत भवनासमोर ही दोन मुले उघड्यावर शौचाला बसली होती. त्याबद्दल या मुलांना हकीम व रामेश्वर यादव यांनी दम दिला. त्यानंतर या अल्पवयीनांना काठ्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या मुलांना रुग्णालयात नेण्यात आले; पण तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मध्यप्रदेशात गोहत्येच्या संशयावरून जबर मारहाणीद्वारे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींची हत्या केल्याचे प्रकार घडत आहेत. आता दलित समाजातील अल्पवयीनांची हत्या करण्यापर्यंत या राज्यातील समाजकंटकांची मजल गेली आहे. (वृत्तसंस्था)
जादूटोण्याचाही संशय
शिवपुरीचे पोलीस अधीक्षक राजेश चंडेल यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचारविरोधी कायद्यान्वये दोन्ही आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दोन अल्पवयीनांच्या हत्या जादूटोण्याच्या प्रकारातून की, अस्पृश्यतेच्या भावनेतून करण्यात आल्या यासंदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत.