बँक अधिकाऱ्यांचा सुट्ट्यांना जोडून दोन दिवसांचा संप; विलीनीकरणास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:38 AM2019-09-14T01:38:02+5:302019-09-14T06:42:31+5:30
२६ ते २९ सप्टेंबरपर्यंत व्यवहार राहणार बंद
नवी दिल्ली : देशातील सरकारी १0 बँकांच्या विलीनीकरणातून चार मोठ्या बँका करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे अधिकाऱ्यांनी २६ व २७ सप्टेंबर रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर, २८ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार व २९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने त्याही दिवशी बँका बंद राहतील. त्यामुळे देशातील सरकारी बँकांचे व्यवहार तब्बल चार दिवस ठप्प होणार आहेत.
याशिवाय या बँक अधिकाºयांनी नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापासून बेमुदत संपावर जाण्याचाही इशारा दिला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कान्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या चार संघटनांनी मिळून संपाचे आवाहन केले आहे.
या चार संघटनांनी इंडियन बँक असोसिएशनला गुरुवारी पाठविलेल्या पत्रात या संपाचा उल्लेख केला आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण व त्यातून चार बँका करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे अनेक बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या नोकºया जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय त्यांनी बँकांचे कामकाज आठवड्यातून पाच दिवस चालावे, आर्थिक व्यवहाराचे तास कमी करण्यात यावे, बँकांच्या कामकाजात अन्य एजन्सीकडून होणारा हस्तक्षेप थांबावा, निवृत्तांचे पेन्शन व फॅमिली पेन्शन यांवर सीलिंग नसावे, त्यांनाही मेडिकल इन्शुरन्सचा फायदा मिळावा आदी मागण्याही या संघटनांनी केल्या आहेत. खातेदारांकडून आकारणारे सेवा शुल्क कमी करावे आवश्यक त्या प्रमाणात नव्याने नोकरभरती करण्यात यावी आणि अकार्यक्षम असल्याचे कारण पुढे करून होणारा अधिकाºयांचा छळ थांबविण्यात यावा, याही अधिकाºयांच्या संघटनेच्या मागण्या आहेत.
खासगी बँका सुरूच राहणार
हा संप सरकारी बँकांमधील अधिकाºयांचाच आहे. त्यात देशातील खासगी बँका सहभागी होणार नाहीत. त्यामुळे २६ व २७ सप्टेंबर रोजी सर्व खासगी बँका नेहमीप्रमाणे कामकाज करणार आहेत. खासगी बँकांच्या खातेदारांना संपाचा थेट परिणाम जाणवण्याची शक्यता कमी आहे.