काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची भरदिवसा हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 06:28 AM2018-10-06T06:28:31+5:302018-10-06T06:29:08+5:30
विभागाध्यक्ष जखमी; मतदानाच्या ३ दिवस आधी अतिरेकी कारवाया
श्रीनगर : महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा तीन दिवसांवर असताना, दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या केली. या हत्यांमुळे केवळ श्रीनगरमध्येच नव्हे, तर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात भीती पसरली आहे. मतदानासाठी लोक बाहेर पडतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
हे दोघे कार्यकर्ते व नॅशनल कॉन्फरन्सचा विभाग अध्यक्ष यांच्यावर काही अतिरेक्यांनी सकाळी गोळीबार केला. त्यात मुश्ताक अहमद वानी व नाझिर अहमद भट्ट हे जागीच ठार झाले. विभाग अध्यक्ष शकील अहमद गनाई हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी होत आहे.
काँग्रेस विरुद्ध भाजपच
काँग्रेसने ४०० हून अधिक उमेदवार उभे केले असून, त्यापैकी १०० हून अधिक जण बिनविरोध विजयी ठरले आहेत. भाजपने ८५० उमेदवार रिंगणात उतरवले असून, काश्मीर खोºयातील त्या पक्षाचे बहुसंख्य उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात चार टप्प्यांत मतदान होणार आहे.