अजित पवारांनी शब्द पाळून फोडले आमदार; २ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 06:24 AM2023-07-03T06:24:36+5:302023-07-03T06:24:51+5:30
महाराष्ट्रात भाजप नेतृत्व प्रदीर्घ काळापासून मविआ फोडण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही दिल्लीत आले होते. तेव्हा भाजप श्रेष्ठींशी त्यांची याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन येतो, असे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ५३ असून, आमदारांचे सदस्यत्व वाचविण्यासाठी दोनतृतीयांश म्हणजेच ३६ आमदार आवश्यक असणार आहेत.
महाराष्ट्रात भाजप नेतृत्व प्रदीर्घ काळापासून मविआ फोडण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे. आधी शिवसेनेचे दोन तुकडे केले. आता त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचेही तेच केले जात आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत भाजप व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत होते. त्यामुळे भाजपने अनेक मायक्रो ऑपरेशन घडवून आणले आहेत. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात सक्रिय होणे, हा त्याच रणनीतीचा भाग आहे. यामुळे मविआची मते विभागली जाणार आहेत.
केंद्रातही मंत्रिपदाची आशा
मोदींच्या मंत्रिमंडळात या महिन्यात फेरबदल होणार असून, शिवसेना शिंदे गटाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. यावेळी सर्व काही ठरले आहे. एक कॅबिनेट मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार हे नाव निश्चित करतील.
‘जे काही झाले, ते अपेक्षितच’
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आता शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साह दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आता तीन इंजिनचे सरकार आले आहे. मविआला दोन वर्षांत दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, जे काही झाले, ते तर होणे अपेक्षितच होते. फरक फक्त एवढा आहे की, ते आता झाले आहे. अजित पवार भाजपबरोबर येण्यासाठी प्रदीर्घ काळापासून तयार होते. याबाबत भाजप नेतृत्वाच्या त्यांच्याबरोबर चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या.