दोन दिवस अगोदरच मिरवणुकीसाठी नंबर विसर्जनाची तयारी : पालिकाही लागली कामाला
By admin | Published: September 13, 2016 11:59 PM2016-09-13T23:59:38+5:302016-09-14T00:41:48+5:30
नाशिक : गुरुवारी (दि. १५) होणार्या गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी शासकीय यंत्रणा आणि गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदा दोन दिवस अगोदरच मंडळांनी नंबर लावले आहेत. महापालिका आणि पोलीस यंत्रणाही विसर्जन मिरवणुकीसाठी कामाला लागली असून मिरवणूक शांततेत आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मंडळांना अनेक अटी शर्तींना सामोरे जावे लागत आहे.
नाशिक : गुरुवारी (दि. १५) होणार्या गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी शासकीय यंत्रणा आणि गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदा दोन दिवस अगोदरच मंडळांनी नंबर लावले आहेत. महापालिका आणि पोलीस यंत्रणाही विसर्जन मिरवणुकीसाठी कामाला लागली असून मिरवणूक शांततेत आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मंडळांना अनेक अटी शर्तींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या ५ सप्टेंबर रोजी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली असून गेले दहा दिवस गणरायाचा जागर करण्यात येत आहे. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता गुरुवारी (दि. १५) अनंत चतुर्दशी असून गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. मंडळांनी मिरवणुकीतील ढोल-ताशांचे पथक आणि साहसी खेळ, लेजीम पथके तयार केली आहेत. अनेक मंडळांची विद्युत रोषणाई असून त्यांनी रथ सजविण्यास प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे यंदा अनेक मंडळांनी वाकडी बारव या ठिकाणी नंबर लावले आहेत. याठिकाणी मिरवणुकीपूर्वी नेहमीच नंबर लावले जात असले तरी यंदा दोन दिवस अगोदरच प्रमुख मंडळांनी आपल्या जागा निश्चित केल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर खड्ड्यांच्या डागडुजीसह अन्य सुविधा देण्याची तयारी केली आहे. मिरवणूक मार्गावरील वीजतारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करण्यात आले आहेत. रामकुंडाबरोबरच शहराच्या विविध भागात महापालिकेने विसर्जन स्थळे निश्चित केली असून तेथे मंडप टाकून विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. जीवरक्षक आणि सुरक्षाप्रहरी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय शहराच्या विविध भागात कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेने मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पाडण्यासाठी तयारी केली असून शहराच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तसेच दोन मंडळांमध्ये अधिक अंतर असता कामा नये, असे मंडळांना सूचित करण्यात आले आहे.
..इन्फो...
महापौरांना पाहणी दौर्याचे विस्मरण
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या दोन ते तीन दिवस अगोदरच महापौर, उपमहापौर तसेच पालिकेचे अधिकारी, पोलीस आणि वीज मंडळाचे अधिकारी वाकडी बारवपासून रामकुंडापर्यंत मार्गाची पाहणी करतात आणि त्यातील संभाव्य अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊन कार्यवाही करतात. यंदा मात्र महापौरांसह संबंधितांना विस्मरण झाले आहे.