बँकेत जाताय! आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:02 AM2021-03-15T08:02:51+5:302021-03-15T08:06:17+5:30
Bank Stike: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IDBI Bank सह आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. या संपामध्ये 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार आहेत.
सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात (Government Bank Privatization) देशभरातील 9 विविध कर्मचारी संघठनांनी एकत्र येत दोन दिवस संप (Bank Strike) पुकारला आहे. या संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनिय़नने हा संप पुकारला आहे. यामुळे सर्व सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार असल्याने आज आणि उद्या असे दोन दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. मात्र, खासगी बँका सुरु राहणार आहेत. (two days Bank strike against privatization.)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IDBI Bank सह आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. या संपामध्ये 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. यामुळे पैशांची देवाण-घेवाण, चेक क्लिअरन्स आणि कर्ज आदी महत्वाची कामे प्रभावित होणार आहेत.
भारतीय स्टेट बँकेसह (SBI) अन्य सरकारी बँकांनी आपल्या ग्राहकांना या संपाबाबत सूचना केल्या आहेत. जर संप झाला तर त्यांचे शाखेतील कामकाज बंद राहण्याची शक्यता आहे. बँकांनी सांगितले की, शाखा सुरु ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. संप रद्द करण्यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सरकारने तीनदा बैठक घेतली होती. परंतू या बैठकी असफल राहिल्या. 4, 9 आणि 10 मार्चला या बैठका झाल्या, यामुळे संप होणार आहे, असे भारतीय बँक कर्मचारी संघाचे महासचिव सी एच वेंकटचलम यांनी सांगितले.
यूएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक इम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज कन्फेडरेशन ऑफ इंडिया आदी संघटना सहभागी आहेत.