Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 08:57 AM2020-04-16T08:57:44+5:302020-04-16T09:07:10+5:30
Coronavirus : दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
चेन्नई - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 370 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 11,000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तळीरामांची अडचण झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता दारू मिळाली नाही म्हणून पाच जण 'मिथेनॉल' प्यायल्याची घटना समोर आली आहे.
तामिळनाडूतील कडलूर ही धक्कादायक घटना घडली आहे. दारू न मिळाल्यामुळे पाच जणांनी चक्क मिथेनॉल प्यायल्याची घटना घडली. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही जण चांगले मित्र होते. त्यांना दारुचं व्यसन असून ते दररोज दारुची पार्टी करत असतं. मात्र त्यांच्याकडील स्टॉक संपल्याने ते मिथेनॉल प्यायले. त्यामुळे अचानक सर्वांची तब्येत बिघडली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे' https://t.co/CieqAMUhBQ#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 16, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जण एका पेस्टिसाईड फर्ममध्ये काम करत होते. तेथूनच ते मिथेनॉल घेऊन आले होते. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील चेंगलपेट जिल्ह्यात दारू मिळाली नाही म्हणून तिघांनी पेंट वॉर्निश प्यायल्याची घटना समोर आली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच केरळमध्ये दारुची दुकानं बंद असल्यामुळे 5 दिवसांमध्ये 5 जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. दारू न मिळाल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल लोक उचलत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'
२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू
CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'