दोन वेगळया रेल्वे स्थानकांवर 'तिने' दिला जुळयांना जन्म
By admin | Published: June 23, 2016 08:42 AM2016-06-23T08:42:11+5:302016-06-23T09:06:41+5:30
गाझियाबाद ते वाराणसी रेल्वे प्रवासा दरम्यान उत्तरप्रेदशातील दोन वेगवेगळया रेल्वे स्थानकावर एका २५ वर्षीय महिलेने दोन जुळया मुलांना जन्म दिला.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २३ - गाझियाबाद ते वाराणसी रेल्वे प्रवासा दरम्यान उत्तरप्रेदशातील दोन वेगवेगळया रेल्वे स्थानकावर एका २५ वर्षीय महिलेने दोन जुळया मुलांना जन्म दिला. पूजा मिश्रा असे या महिलेचे नाव असून, ती मंगळवारी काशी विश्वनाथ एक्सप्रेसने गाझियाबादहून वाराणसी येथे चालली होती.
प्रवासात पती संजय कुमारही तिच्यासोबत होते. गर्भवती असलेल्या पूजाला आलमनगर स्थानकापासून काही अंतरावर असताना प्रसूती कळा सुरु झाल्या. पती संजयने लगेच रेल्वे कर्मचा-यांना याची माहिती दिली. रेल्वे कर्मचा-यांनी लगेच लखनऊ रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती कळवली.
प्रसूती कळा असहय्य झाल्यानंतर पूजाने आलमनगर रेल्वे स्थानकात एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यानंतर ट्रेन पुढच्या चारबाग स्थानकाच्या दिशेने निघाली. तिथे संपूर्ण मेडीकल टीम सज्ज होती. चारबाग रेल्वे स्थानकात पूजाने एका कन्यारत्नाला जन्म दिला. आलनगर ते चारबाग हे रेल्वेने दहा मिनिटांचे अंतर असून, दोन्ही जुळया मुलांच्या जन्मामध्येही दहा मिनिटांचे अंतर आहे.