किसान युनियनमध्ये दोन गट; नरेश, राकेश टिकैत यांना हटविले, राजेश सिंह चौहान अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 06:24 AM2022-05-16T06:24:04+5:302022-05-16T06:24:35+5:30
शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन दोन गटांत विभागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ : शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन (भाकियु) दोन गटांत विभागली. लखनौच्या ऊस संस्थान सभागृहामध्ये भाकियु कार्यकारिणीच्या बैठकीत महेंद्र सिंह टिकैत यांची दोन मुले नरेश व राकेश टिकैत यांना भाकियुच्या कार्यकारिणीतून बरखास्त करण्यात आले.
नरेश टिकैत यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरूनही हटविण्यात आले. भाकियुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भाकियु (अराजकीय)ची स्थापना करण्यात आली. नरेश व राकेश टिकैत हे राजकारण करणारे लोक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले होते, असा आरोप राजेश सिंह चौहान यांनी केला.
भाकियुचे नवे अध्यक्ष राजेश सिंह चौहान यांनी दावा केला आहे की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले जाणार नाहीत. आम्ही महेंद्र सिंह टिकैत यांच्या मार्गावर चालणार आहोत. आम्ही १३ दिवस आंदोलनात होतो. परंतु, जमा झालेल्या निधीच्या एक रुपयालाही स्पर्श केला नाही. शेतकऱ्यांना सन्मान देणे आमचे काम आहे. राजेश सिंह चौहान हे यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असून, भाकियुच्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आता आम्ही संघटनेची नव्या पद्धतीने बांधणी करू. देशातील शेतकरी नेते राकेश व नरेश यांच्या पवित्र्याने नाराज आहेत. आम्ही तर प्रत्येक व्यासपीठावर शेतकऱ्यांच्या समस्या उपस्थित करण्याचा संकल्प केला आहे. परंतु, नरेश व राकेश हे शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करण्याऐवजी लांगूलचालनात अडकले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर भाकियु नेत्यांच्या सुरू झालेल्या असंतोषातून रविवारी वेगळा मार्ग निवडला. तथापि, याचे संकेत मिळाल्यानंतर भाकियुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत शुक्रवारीच लखनौमध्ये दाखल झाले होते.
३५ वर्षांपूर्वी झाली होती भाकियुची स्थापना
१ मार्च १९८७ रोजी महेंद्र सिंह टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी भारतीय किसान युनियनची स्थापना केली होती. त्याच दिवशी करमूखेडी वीज केंद्रावर पहिले धरणे धरण्यात आले. यावेळी हिंसाचार झाला व शेतकरी आंदोलन उग्र झाले. पीएसीचा शिपाई व एका शेतकऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. पोलिसांचे वाहन जाळण्यात आले होते. त्यानंतर कोणताही तोडगा न निघता धरणे समाप्त करण्यात आले. १७ मार्च १९८७ रोजी भाकियूची पहिली बैठक झाली. ही संघटना शेतकऱ्यांची लढाई लढेल व नेहमी अराजकीय राहील, असे ठरले. यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशात भाकियु शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करू लागली. आज या संघटनेत दोन गट झाले.