काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 00:31 IST2019-06-27T00:31:00+5:302019-06-27T00:31:40+5:30
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. दक्षिक काश्मीरमधील अनंतनागमधील बीजाबेहारा विभागातील सिरहामा गावात दहशतवाद्यांच्या दोन गटामध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये एक दहशतवादी मारला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिजबूल मुजाहिद्दीन आणि आयएसजेके या दोन दहशतवादी गटांमध्ये हा गोळीबार झाला. यात आयएसजेकेचा एक दहशतवादी ठार झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांत गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. ठार करण्यात आलेला दहशतवादी झाकीर मुसा याचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफ यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या दहशतवाद्याला ठार करण्यात आले. या दहशतवाद्याची ओळख शब्बीर मलिक अशी समोर आली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.